विटा येथे १० एप्रिलला राष्ट्रीय महा लोकअदालत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:25 AM2021-03-18T04:25:12+5:302021-03-18T04:25:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : विटा येतील दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर व कनिष्ठ स्तर तसेच फौजदारी न्यायालयातील प्रलंबित दिवाणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : विटा येतील दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर व कनिष्ठ स्तर तसेच फौजदारी न्यायालयातील प्रलंबित दिवाणी दावे, तडजोड योग्य फौजदारी खटले आणि न्यायालयात दाखल सर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्याची पुन्हा एकदा संधी राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण, दिल्ली; सर्वोच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाच्या राज्य विधि सेवा प्राधिकरणाने उपलब्ध करून दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर विटा विधि सेवा समिती व वकील संघटनेतर्फे विटा येथे दि. १० एप्रिल रोजी राष्ट्रीय महा लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती खानापूर तालुका विधि सेवा समितीचे अध्यक्ष तथा वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश ए. एन. कुलकर्णी यांनी दिली.
न्या. कुलकर्णी म्हणाले, विटा येथील राष्ट्रीय महा लोकअदालतीत या न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे, धनादेशासंबंधीची प्रकरणे, तसेच दावापूर्व प्रकरणांमध्ये बॅँकांची कर्ज प्रकरणे, नगरपालिका, ग्रामपंचायती यांची पाणीपट्टी, दिवाबत्ती, कर प्रकरणे, इत्यादी प्रकारचे खटले तडजोडीने मिटविण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.
त्यामुळे या लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन त्यांची न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे न्यायालयाच्या मध्यस्थीने तडजोडीने मिटवावीत. तसेच त्या दिवशी कोविड-१९ या साथीच्या रोगाचा प्रसार होणार नाही, याकरिता सर्वांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहनही यावेळी न्या. ए. एन. कुलकर्णी यांनी केले.