नॅशनल मास्टर मैदानी स्पर्धेत हातोडा फेकमध्ये भगवान बोतेंचा देशात दुसरा क्रमांक, आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 03:51 PM2022-05-21T15:51:20+5:302022-05-21T15:52:49+5:30
जपान टोकियो येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
आष्टा : केरळ त्रिवेंद्रम येथे झालेल्या चौथ्या नॅशनल मास्टर मैदानी स्पर्धेत हातोडा फेकमध्ये राष्ट्रीय खेळाडू भगवान शामराव बोते यांनी देशात दुसरा क्रमांक पटकाविला. त्यांनी ३१.६६ मीटर हातोडा फेकला. त्यांची जपान टोकियो येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आष्टा येथील राजाराम शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल तुंगचे ते मुख्याध्यापक आहेत.
राष्ट्रीय खेळाडू भगवान बोते यांनी मुंबई, पुणे, इंदापूर , अकोला, सांगली, बीड, उस्मानाबाद येथील राज्यस्तरीय स्पर्धेत ९ वेळा प्रथम क्रमांक पटकावला होता. मणिपूर व तामिळनाडू येथील राष्ट्रीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला होता. त्यांनी सांगली जिल्ह्यात सुमारे साडेसातशे पेक्षा जास्त खेळाडू घडवले आहेत. तर, शहरात दीडशे पेक्षा जास्त स्पर्धा घेतल्या आहेत. नगरसेवक व उपनगराध्यक्ष असताना त्यांनी आपला सर्व भत्ता खेळाडूंसाठी खर्च केला. ते राष्ट्रीय ॲथलेटिक्स पंच परीक्षा देखील पास झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.