राष्ट्रीय मतदार दिवस-मतदारांनी सहकार्य करावे : डॉ. स्वाती देशमुख-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 04:41 PM2020-01-14T16:41:13+5:302020-01-14T16:49:27+5:30
राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी 2020 रोजी साजरा करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील यांनी केले.
सांगली : राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी 2020 रोजी साजरा करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील यांनी केले.
भारत निवडणूक आयोग, प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडील आदेशानुसार दिनांक 25 जानेवारी 2020 हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करावयाचा आहे. त्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील सर्व मतदार केंद्रावर दिनांक 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदार संघातील मतदार व नव युवक, युवती यांनी आपल्या रहिवाशी भागातील मतदान केंद्रावर उपस्थित राहवे, असे आवाहन डॉ. स्वाती देशमुख-पाटील यांनी केले.
राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्याबाबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस जिल्हास्तरावरील सर्व शासकीय कार्यालयाचे प्रमुख, महाविद्यालयीन प्राचार्य, एनसीसी, एनएसएस, एनवायके प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत निवडणूक साक्षरता क्लब, चुनाव पाठशाळा, मतदार जागृती मंचाची स्थापना करून मतदार व मतदान प्रक्रियेबाबत जागृती करण्याबाबत आवाहन करण्यात आले.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील म्हणाल्या, दिनांक 25 जानेवारी 2020 हा दिवस 10 वा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या वर्षीच्या कार्यक्रमासाठी निवडणूक आयोगाने Electoral Literacy for Stronger Demoracy हा विषय घोषित केला आहे.
या दिनानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सांगली येथील स्टेशन चौकात मतदारांसाठी प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. तसेच मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच स्टेशन चौक ते पुष्कराज चौक व परत स्टेशन चौक पर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीनंतर जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे मुख्य कार्यक्रम होणार आहे.