तासगाव बाजार समितीत राष्ट्रवादी-भाजप युती?
By Admin | Published: July 8, 2015 11:58 PM2015-07-08T23:58:26+5:302015-07-08T23:58:26+5:30
तेरा-चारच्या फॉर्म्युल्यावर चर्चा : सूतगिरणीतील समझोत्याने शिक्कामोर्तब
दत्ता पाटील- तासगाव -तासगावसह तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या स्वामी रामानंद भारती सूतगिरणीची निवडणूक अखेर बिनविरोध झाली. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, पक्षातील सर्व कार्यकर्त्यांचे अर्ज काढून घेतले. याचवेळी सूतगिरणीचा समझोता करीत असतानाच बाजार समितीच्या निवडणुकीतही भाजप आणि राष्ट्रवादीत समझोता होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी आणि भाजपच्या गोटात सध्या १३-४ या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू आहे.
तासगाव तालुक्यातील बाजार समिती आणि सूतगिरणी या दोन महत्त्वाच्या निवडणुकांसाठी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यापैकी सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध झाली असली तरी, तालुक्यासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या बाजार समितीच्या निवडणुकीने राजकीय वातावरण ढवळून निघत आहे.
बाजार समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जोरदार चुरस आहे. या निवडणुकीत परंपरेप्रमाणे दोन प्रबळ गट एकत्र येणार, की दोन पक्षात सामना रंगणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.
सूतगिरणीत राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीला खिंंडीत गाठण्यासाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. ताकद नसतानादेखील खासदार पाटील यांनी बाजार समितीची समीकरणे जुळवून घेण्यासाठी खेळी खेळली होती. राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंंदे आणि आमदार जयंत पाटील यांनी खासदार पाटील यांच्याशी बिनविरोधबाबत चर्चा केली. त्यांनीही होकार देत सर्व अर्ज मागे घेतले. ही प्रक्रियाच बाजार समिती निवडणुकीची नांदी ठरणार आहे. दोन्ही पक्षांनी आघाडी करण्याबाबत होकार दिलेला नसला तरी, स्पष्ट नकारही दिलेला नाही.
आघाडीबाबत चर्चा सुरू
गत निवडणुकीत खासदार पाटील आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यात झालेल्या तडजोडीनुसार १२-७ च्या फॉर्म्युल्यानुसार जागावाटप झाले होते. यावेळी खासदार पाटील भाजपमध्ये आहेत. बाजार समितीचे मतदार असणाऱ्या बहुतांश संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यामुळे १२-७ ऐवजी राष्ट्रवादीला १३ आणि भाजपला ४ जागा, या फॉर्म्युल्यानुसार आघाडी करण्याबाबतदेखील सध्या चर्चा सुरु आहे.
तह कोणता?
सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादीकडून विनंती केल्यानंतर भाजपकडून अर्ज काढण्यात आले. मात्र विनाअट, विनातह करता राजकारणात कोणतीच गोष्ट सहजपणे होत नाही, याची जाणीव तालुक्यातील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांत झालेला तह कोणता? याची कार्यकर्त्यांना उत्सुकता लागून राहिली असली तरी, बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भातच तह झाला असून, ऐनवेळी याबाबत भूमिका स्पष्ट केली जाईल, असे बोलले जात आहे.