तासगावात राष्ट्रवादी चेकमेट
By Admin | Published: September 17, 2016 11:45 PM2016-09-17T23:45:35+5:302016-09-18T00:03:34+5:30
तिरक्या चालीने कारभाऱ्यांचे कारनामे : भाजप, राष्ट्रवादीत सुंदोपसुंदी कायम
दत्ता पाटील--तासगावच्या नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेला अर्ज राष्ट्रवादीने नाट्यमय घडामोडीनंतर माघार काढून घेतला. पक्षादेशापर्यंत तयारी करुनदेखील अर्ज माघारी काढण्याचा प्रकार नेतृत्वासह कार्यकर्त्यांनाही बुचकळ्यात टाकणारा ठरला. पहिल्या टप्प्यात भाजपच्या आणि दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादीच्या बड्या पदाधिकाऱ्यांनी खेळलेल्या तिरक्या चालीने राष्ट्रवादीसह, भाजपातील नाराज चेकमेट झाले. या चालीनेच भाजपचा मार्ग सुकर ठरला. यानिमित्ताने भाजपसोबत राष्ट्रवादीतील सुंदोपसुंदी कायम असल्याचे दिसून आले.
तासगाव नगरपालिकेत भाजपचे एकहाती साम्राज्य निर्माण झाल्यापासून शहरातील राष्ट्रवादी तशी कोमात गेल्याचे चित्र होते. अविनाश पाटील यांच्या नगराध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर भाजपमध्ये नगराध्यक्ष निवडीसाठी रस्सीखेच झाली. राजू म्हेत्रे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर अनिल कुत्तेंसह चार नगरसेवकांनी राजीनामे देत नाराजी व्यक्त केली. भाजपच्या नाराजीचा फायदा घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली. बहुमत नसतानाही पालिकेचा गड काबीज करण्यासाठी मार्चेबांधणी केली. अगदी जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांची इच्छा नसतानाही, अट्टाहास करुन पक्षादेश तयार करुन घेतला. राष्ट्रवादीने पक्षादेशाची तयारी केल्याने भाजपमध्ये चुळबूळ सुरु झाली होती. मात्र शुक्रवारी राष्ट्रवादीने अनपेक्षितपणे अर्ज माघार काढला. दोन दिवसांपासून राष्ट्रवादीत अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या होत्या. नगरसेवक अमोल शिंदे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र नगरसेवक अजय पाटील पाटील यांनी अर्ज काढून घेण्यास सांगितल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात सुरु झाली. नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश थोरात हे अजय पाटील यांच्या मर्जीतील असल्याने त्यांनी अर्ज माघार काढून घेतल्याची चर्चा पालिकेत होती.
ऐनवेळी राष्ट्रवादीकडून अर्ज माघार काढून घेण्यात आला. अर्ज काढण्यापूर्वी राष्ट्रवादीतील दोन गटांत मतभेद निर्माण झाले होते. एका गटाचा निवडणूक लढवण्यासाठी आटापिटा सुरु होता, तर दुसऱ्या गटाने अ़र्ज काढण्याची तयारी केली होती. त्यामुळे भाजपच्या गटबाजीने रिचार्ज झालेल्या राष्ट्रवादीचे राजकारण सुंदोपसुंदीच्या मूळ वळणावर येऊन ठेपले. याच सुंदोपसुंदीने राष्ट्रवादी सत्तेतून यापूर्वी पायउतार झाली होती. थोरातांनी अर्ज काढल्याने भाजपमधील नाराजांची नाराजीही गुलदस्त्याच राहिली. मात्र यानिमित्ताने भाजपची गटबाजी उघड करुन, त्याचा राजकीय फायदा करुन घेण्याची संधी राष्ट्रवादीने गमावल्याने राष्ट्रवादीचे पालिकेतील राजकारण चेकमेट झाले. याउलट अर्ज दाखल करण्यापासून ते पक्षादेशापर्यंतच्या राष्ट्रवादीच्या घडामोडी तासगावकरांसाठी थट्टेचा विषय ठरल्या.
तिरकी चाल : अन् पैऱ्याचे राजकारण
बुध्दिबळाच्या खेळातील उंटाची तिरकी चाल सहजासहजी लक्षात येत नाही. अगदी त्याचप्रमाणे यावेळच्या नगराध्यक्ष निवडीत भाजप आणि राष्ट्रवादीतील काही कारभाऱ्यांनी तिरकी चाल खेळली. सुरुवातील भाजपमधील काही कारभाऱ्यांनी नगराध्यक्षपदासाठी तिरक्या चालीची खेळी केली. याच चालीतून राष्ट्रवादीतून अर्ज भरल्याची चर्चा आहे. भाजपमधील कारभाऱ्यांची चाल यशस्वी झाली; मात्र अर्ज दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीतील पाद्यांनी नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरण्यासाठी मोर्र्चेबांधणी सुरु केली. पाद्यांच्या मदतीला हत्ती, घोड्यांची भूमिका बजावणारे शिलेदारही आले. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीतील एका पदाधिकाऱ्याने उंटाची तिरकी चाल केली. ऐनवेळी अर्ज माघारी काढून घेतला. बुध्दिबळाच्या खेळात पाहायला न मिळणारा विरोधकाशी हातमिळवणी करणाऱ्या तिरक्या चालीचा प्रकार यानिमित्ताने तासगावकरांना पाहायला मिळाला. या चालीमागे भाजपमधील तिरकी चाल करणाऱ्या कारभाऱ्या असलेल्या पैऱ्याचे राजकारणही चर्चेत आहे. आता भाजपकडून राष्ट्रवादीतील सूत्रधाराचा पैरा कसा फेडला जाणार, याची उत्सुकता असून, आगामी निवडणुकीत पैरा फेडला जाण्याचीही शक्यता आहे.