जत राष्ट्रवादीला हव्यात चार जागा
By admin | Published: June 26, 2015 11:48 PM2015-06-26T23:48:41+5:302015-06-27T00:16:59+5:30
सांगली बाजार समिती : जयंत पाटील यांना पदाधिकाऱ्यांचे साकडे
सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कोणाशीही युती करा, मात्र जत तालुका राष्ट्रवादीला चार जागा द्या, अशी आग्रही मागणी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे नेते व आ. जयंत पाटील यांच्याकडे केली. यासंदर्भात शुक्रवारी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात बैठकही झाली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे उपस्थित होते.या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जत तालुकाध्यक्ष बसवराज दोडमणी, चन्नाप्पा होर्तीकर, सिध्दाण्णा शिरसट, महादेव पाटील, राम पाटील, आर. के. पाटील आदी उपस्थित होते. बाजार समितीच्या निवडणुकीत जत तालुक्याचे वर्चस्व आहे. सहकारी संस्थेचे २६६८ पैकी ९९१ मतदार जतचे आहेत. ग्रामपंचायतीच्या २२६८ मतदारांपैकी १००४ जत तालुक्याचे आहेत. एकूण ८२२५ पैकी २१७६ मतदार जत तालुक्यातील आहेत. यामुळे या निवडणुकीत जत तालुक्याचे प्राबल्य राहणार आहे. यामुळे जतच्या राष्ट्रवादीला चार जागा सोडण्यात याव्यात. राष्ट्रवादीने कोणाशीही युती करावी, त्यांच्यासोबत जत तालुका राहणार आहे. मात्र जत तालुक्याला योग्य प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी जयंत पाटील यांनी यासंदर्भात सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर इतर पक्षांशीही चर्चा सुरु असून, लवकरच याबाबत निर्णय जाहीर करु असे आश्वासन दिले.
विलासराव शिंदे म्हणाले की, प्रत्येक पक्ष आपापल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करीत आहेत. राष्ट्रवादीही सर्व पक्षांशी चर्चा करणार आहे. याबाबतचे सर्व अधिकार जयंत पाटील यांना आहेत. इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे कोणताही निर्णय घेण्यास विलंब लागणार आहे. तरीही येत्या दोन दिवसात आपले धोरण जाहीर करण्यात येईल. नेतेमंडळी चर्चा करुन निर्णय घेतील. सध्या तरी जे इच्छुक आहेत त्यांनी अर्ज भरण्यास प्रारंभ केला आहे. येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय घेण्यासाठी जयंत पाटील बैठक घेणार आहेत. त्यानंतर निर्णय जाहीर करण्यात येईल. (प्रतिनिधी)
इच्छुकांच्या संख्येमुळे निर्णय लांबणीवर
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी इच्छुकांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढल्याने राष्ट्रवादी पक्षाने आपला निर्णय लांबणीवर टाकला आहे. एके ठिकाणी उमेदवारी न मिळाल्यास इच्छुक दुसऱ्या पक्षात जाण्याच्या भीतीमुळे ऐनवेळी पक्षाचा निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. सध्या तरी इच्छुकांकडून उमेदवारी दाखल करण्यात येत आहे. ६ जुलैपर्यंत उमेदवारी दाखल करण्याची मुदत असून, पक्षाचे धोरण ४ जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.