Sangli Politics: जयंत पाटील यांच्या मौनात आगामी राजकीय ‘कार्यक्रमा’ची नांदी, कार्यकर्ते संभ्रमात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 04:40 PM2024-03-14T16:40:27+5:302024-03-14T16:40:54+5:30
समर्थक, पदाधिकाऱ्यांनीही घेतली सावध भूमिका
अशोक पाटील
इस्लामपूर : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सत्ताधारी गटात जयंत पाटील यांच्या प्रवेशाच्या चर्चेनंतर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करीत जाब विचारला होता. आता तेच अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून जयंत पाटील यांनी स्वत:च्या राजकीय वाटचालीबाबत मौन बाळगले आहे. त्यांचे हे मौन भविष्यातील राजकीय ‘कार्यक्रमा’ची नांदी तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाची संपूर्ण धुरा आता जयंत पाटील यांच्या खांद्यावर आहे. संपूर्ण राजकीय कारकिर्दीत जयंत पाटील यांच्या भूमिका राजकीय पटलावर रहस्यपूर्णच ठरल्या. मौन बाळगून योग्य वेळी ‘कार्यक्रम’ करण्यात ते पारंगत असल्याचे राजकीय तज्ज्ञ सांगतात. राज्यातील राजकारणात अनेक उलथापालथी झाल्यानंतर जयंत पाटील यांच्या भूमिकेविषयी कोणालाच अचूक अंदाज बांधता आला नाही. जयंत पाटील यांनीही या विषयावर बाेलणे टाळणे पसंत केले.
लोकसभा निवडणुकीचे वारे आता वाहू लागल्यानंतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीकडून उमेदवार कोण असणार, यावरून तर्कवितर्क सुरू आहेत. जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांच्या नावाची चर्चा दोन वर्षांपासून सुरू आहे. परंतु, यावर जयंत पाटील यांनी कधीच स्पष्ट भाष्य केले नाही. योग्य वेळी आपण त्यावर बोलू, अशी मोजकी प्रतिक्रिया देऊन त्यांनी विषय टाळले आहेत.
हातकणंगले मतदारसंघाच्या दोऱ्या अजूनही जयंत पाटील यांच्याच हाती आहेत. तरीही या मतदारसंघातील उमेदवारीबाबत त्यांनी ठाम भूमिका मांडली नाही. त्यामुळे त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यांच्याप्रमाणेच त्यांचे समर्थकही सध्या मौन बाळगण्यात धन्यता मानत आहेत. तरीही पक्षांतर्गत त्यांच्या भूमिकेबाबत दबक्या आवाजात ऊलटसुलट चर्चा सुरुच आहे.
उमेदवारी जाहीर होताच भूमिका स्पष्ट
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुती व इंडिया आघाडी या दोन्ही प्रमुख पक्षांकडून अद्याप उमेदवार निश्चित नाहीत. उमेदवारीच्या निर्णयाचा अंदाज घेण्याचे काम सध्या जयंत पाटील यांच्याकडून सुरू आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.