‘स्वाभिमानी’चा टक्का राष्ट्रवादी कॉँग्रेसमुळे घसरला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:06 AM2019-04-26T00:06:22+5:302019-04-26T00:06:27+5:30
अशोक पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शेतकऱ्यांच्या ताकदीवर राजकीय पटलावर आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी ...
अशोक पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शेतकऱ्यांच्या ताकदीवर राजकीय पटलावर आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी काँग्रेस आघाडीमध्ये सहभागी झाले. मात्र लोकसभेच्या हातकणंगले मतदारसंघातील वाळवा आणि शिराळा तालुक्यांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांच्या सलगीमुळे स्वाभिमानीचा टक्का घसरल्याची चर्चा आहे. शेट्टी यांच्याविरोधात सक्रिय असलेली रयत क्रांती संघटनाही लोकसभा निवडणुकीत बॅकफूटवर गेली आहे.
२0१४ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार राजू शेट्टी आणि त्यांचे सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या महाआघाडीत सामील होऊन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला आव्हान दिले होते. त्यानंतर खोत यांना कृषी राज्यमंत्रीपद मिळाले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडली. दोघांमधील मतभेद वाढतच गेले. जिल्हा परिषद निवडणुकीत तर या दोघांमध्ये मोठी दरी पडली. यातून खोत यांनी भाजपची शाल पांघरून नव्या रयत क्रांती संघटनेची स्थापना केली. लोकसभा निवडणुकीपूर्वी खासदार शेट्टी हे खोत आणि भाजप सरकारवरील नाराजीतून काँगे्रस महाआघाडीमध्ये सामील झाले. महाआघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शेट्टी यांनी निवडणूक लढवली. परंतु हे अनेक शेतकऱ्यांना रूचले नाही. यांनी त्यातल्या त्यात आमदार जयंत पाटील यांच्याशी केलेल्या सलगीवरही सर्वसामान्य शेतकरी संतप्त प्रतिक्रिया देत होते. आता या परिसरातील मतदानाचा टक्का घसरला आहेच आणि याचा थेट फटका ‘स्वाभिमानी’ला बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
प्रारंभीच्या टप्प्यात शेट्टी यांच्याविरोधात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजकीय नांगरट केली होती. परंतु भाजप आणि शिवसेनेची युती झाली. जागावाटपात ही जागा शिवसेनेकडे गेली. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या धैर्यशील माने यांना शेट्टींविरोधात उमेदवारी देण्यात आली. तेव्हापासून रयत क्रांती संघटनेच्या चर्चेलाही पूर्णविराम मिळाला. संपूर्ण निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी सदाभाऊ खोत राज्यभर फिरले. मात्र त्यांची वाळव्यातील रयत क्रांती संघटना बॅफूटवरच गेली.