शहर सुधार समितीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचा गळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 11:18 PM2019-02-08T23:18:22+5:302019-02-08T23:19:48+5:30
सांगली जिल्हा सुधार समितीच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार व समितीचे अध्यक्ष अॅड. अमित शिंदे यांच्यात
सांगली : सांगली जिल्हा सुधार समितीच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार व समितीचे अध्यक्ष अॅड. अमित शिंदे यांच्यात दिल्लीमध्ये प्राथमिक चर्चाही झाली. सुधार समितीने गेल्या काही वर्षात महापालिका क्षेत्रात चांगलाच जम बसविला आहे. त्यामुळे सुधार समितीचे राष्ट्रवादीत विलिनीकरण व्हावे, यासाठी गळ टाकण्यात आला आहे. पण अद्याप त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही.
जिल्हा सुधार समितीने गेल्या काही वर्षांत महापालिका क्षेत्रात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. महापालिकेतील अनेक घोटाळ्यांची मालिका समितीने उघडकीस आणली. घनकचरा प्रकल्प, निविदेतील घोळ, रस्ते, गटारींची निकृष्ट कामे अशा अनेक मुद्द्यांवर सुधार समितीने रान पेटविले होते. महापालिका प्रशासन व तत्कालीन सत्ताधाऱ्यांना समितीने नाकीनऊ करून सोडले होते. घनकचरा प्रकल्पासाठी समितीने हरित न्यायालयातही धाव घेतली होती. त्यामुळेच हरित न्यायालयाने महापालिकेला ४२ कोटी रुपये विभागीय आयुक्तांकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. गेल्या आॅगस्टमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत सुधार समितीने उमेदवार उभे केले होते. समितीला निवडणुकीत यश मिळाले नसले तरी, काही प्रभागात त्यांच्या उमेदवारांना चांगलीच मते मिळाली होती.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशपातळीवर भाजप विरोधकांना एकत्र आणले जात आहे. या पार्श्वभूमीवर सांगली महापालिका क्षेत्रातील सुधार समितीनेही राष्ट्रवादीत प्रवेश करावा, यासाठी काही दिवसांपासून वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू होते. त्याचाच एक भाग म्हणून दोन दिवसांपूर्वी दिल्ली येथे ज्येष्ठ नेते शरद पवार व समितीचे अध्यक्ष अॅड. अमित शिंदे यांच्यात प्राथमिक चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाली असली तरी, अद्याप समितीने राष्ट्रवादीत प्रवेशाबाबत होकार दिलेला नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्याशीही समिती चर्चा करणार आहे. पाटील यांच्या चर्चेनंतर राष्ट्रवादी प्रवेशाबाबत निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
समितीला हवी मोकळीक
सुधार समितीने महापालिका क्षेत्रात जम बसविला असला तरी, पक्षीय पाठबळाशिवाय त्यांच्या कार्याला भरारी मिळालेली नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या प्रवेशाबाबत सकारात्मक निर्णयाची शक्यता अधिक आहे. त्यातही समितीने गेल्या काही वर्षात भ्रष्टाचार, अनियमितता या मुद्द्यांवर आंदोलन केले आहे. समितीच्या कार्यकर्त्यांना पक्षीय बंधनात मर्यादा येणार आहे. त्यामुळेच पक्षात प्रवेश केल्यानंतरही समितीला आपले काम करण्यासाठी मोकळीक हवी आहे. त्यावर प्रवेशाचा निर्णय होणार आहे.
समितीला हवी मोकळीक
सुधार समितीने महापालिका क्षेत्रात जम बसविला असला तरी, पक्षीय पाठबळाशिवाय त्यांच्या कार्याला भरारी मिळालेली नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या प्रवेशाबाबत सकारात्मक निर्णयाची शक्यता अधिक आहे. त्यातही समितीने गेल्या काही वर्षात भ्रष्टाचार, अनियमितता या मुद्द्यांवर आंदोलन केले आहे. समितीच्या कार्यकर्त्यांना पक्षीय बंधनात मर्यादा येणार आहे. त्यामुळेच पक्षात प्रवेश केल्यानंतरही समितीला आपले काम करण्यासाठी मोकळीक हवी आहे. त्यावर प्रवेशाचा निर्णय होणार आहे.