तासगावात राष्ट्रवादी मौनात की कोमात?

By admin | Published: October 14, 2015 11:26 PM2015-10-14T23:26:50+5:302015-10-15T00:35:59+5:30

नगरसेवकांची सोडचिठ्ठी : नेत्यांची हतबलता

The nationalist is kamat karate in hours? | तासगावात राष्ट्रवादी मौनात की कोमात?

तासगावात राष्ट्रवादी मौनात की कोमात?

Next

दत्ता पाटील--तासगाव नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करुन पक्षाला धक्का दिला आहे. एकेकाळी पालिकेत बहुमतात असलेल्या राष्ट्रवादीचे, आता अस्तित्व शोधण्याची वेळ आली आहे. शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत असतानादेखील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मौन सोडलेले नाही. भाजपचे कमळ हातात धरणाऱ्या नगरसेवकांवर कारवाईचा बडगाही उगारलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी मौनात आहे की कोमात, असाच प्रश्न उपस्थित होत आहे.
दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील आबा आणि खा. संजयकाका पाटील यांच्या गटाने एकत्रितपणे तासगाव नगरपालिकेची गतवेळची निवडणूक लढवली होती. त्यात आबा गटाचे वर्चस्व होते. दोन्ही नेते एकत्र असतानादेखील कार्यकर्त्यांत कुरघोडीचे राजकारण सुरूच होते. किंंबहुना खासदार संजय पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन्ही गटांतील कुरघोड्या वाढल्या. दरम्यान, आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर मात्र राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची अवस्था, वर्चस्व असूनदेखील आत्मविश्वास गमावल्यासारखी झाली होती. नगरसेवकांतील वैयक्तिक हेवेदावे आणि अंतर्गत संघर्षाचा फायदा घेत खा. संजयकाका पाटील यांनी नाराज नगरसेवकांना गळ लावला. तीन नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश देत, त्यापैकी एकाला नगराध्यक्षपदही बहाल केले.
पालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर राजकीय स्थित्यंतर थांबेल, असे वाटत असतानाच, राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. आयेशा नदाफ यांचे नगरसेवकपद रद्द होऊ नये, यासाठी खासदार संजयकाकांनी खेळी केली. त्यानंतर डॉ. नदाफ यांनीही खासदारांचे नेतृत्व मान्य केले. नगराध्यक्ष बदलासाठी राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी राष्ट्रवादीत राहूनच भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. त्यापैकी नगरसेवक जाफर मुजावर यांनाही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपवासी केले.
आबांच्या पश्चात पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्के बसत असताना, पक्षातील नेते मात्र मौन धारण करुन आहेत. पक्षाला अस्तित्व शोधण्याची वेळ आली असताना, नेत्यांचे मौन का, असा सवाल सामान्य कार्यकर्ते विचारत आहेत. कवठेमहांकाळ पंचायत समितीत पक्ष सोडणाऱ्या सदस्यांना सदस्यत्व रद्दचा इशारा पक्षाकडून देण्यात आला. मात्र तासगाव पालिकेत भाजपचे कमळ हातात धरणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करण्यासाठी नेते हतबल झाले आहेत का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.


सामान्य कार्यकर्ता राष्ट्रवादीसोबतच
नगरसेवकांनी वैयक्तिक स्वार्थापोटीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. स्वार्थीनी पक्ष सोडल्यामुळे यापुढे निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. आ. सुमनताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे वर्चस्व दाखवून देणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कमलेश तांबवेकर आणि स्वप्नील जाधव यांनी सांगितले.


लक्ष कोण घालणार?
काही महिन्यांपूर्वी तासगाव-कवठेमहांकाळमध्ये दुसऱ्या नेतृत्वाला लक्ष देण्याची आवश्यकता नसल्याचे वक्तव्य पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. आता कवठेमहांकाळ पंचायत समिती आणि तासगाव नगरपालिका दोन्हीकडे भाजपने धक्का दिला आहे. आता तरी राष्ट्रवादीचे नेते लक्ष घालणार का, याची चर्चा आहे.

Web Title: The nationalist is kamat karate in hours?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.