जिल्ह्यात भाजप की राष्ट्रवादी ‘नंबर वन’?

By admin | Published: February 22, 2017 11:19 PM2017-02-22T23:19:36+5:302017-02-22T23:19:36+5:30

जिल्हा परिषद : काँग्रेसला १५ जागांची संधी शक्य; सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादीकडे राहण्याची चिन्हे

Nationalist 'number one' in BJP's district? | जिल्ह्यात भाजप की राष्ट्रवादी ‘नंबर वन’?

जिल्ह्यात भाजप की राष्ट्रवादी ‘नंबर वन’?

Next



सांगली : जिल्हा परिषदेत सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून भाजप आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. भाजपला १६ आणि मित्र पक्षाचा चार अशा २० जागा अपेक्षित आहेत. राष्ट्रवादीला १५ ते १८, तर काँग्रेसला १३ ते १५ जागांवर विजय मिळण्याची चिन्हे आहेत. शिवसेना, माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाला प्रत्येकी तीन जागा मिळण्याची शक्यता असून, ते ‘किंगमेकर’ ठरतील.
मिरज तालुक्यातील बेडग पंचायत समिती गणातून भाजपच्या गीतांजली कणसे आणि कवठेपिरान गणातून काँग्रेसचे अनिल आमटवणे बिनविरोध विजयी झाले. निकालापूर्वीच मिरज पंचायत समितीत भाजपने खाते खोलले आहे. पंचायत समितीच्या उर्वरित ११८ आणि जिल्हा परिषदेच्या ६० जागांसाठी चुरशीने ७१.२४ टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक महिला मतदारांची संख्या ७१.३० टक्के आहे. पलूस तालुक्यात विक्रमी ८०.८३ टक्के मतदान झाल्यामुळे तेथील चित्र बदलण्याची शक्यता आहे. तेथे काँग्रेसचे नेते, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांना धक्का बसण्याची शक्यता असून, दोन जागा भाजपला ,तर काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळण्याची शक्यता आहे. येथील पंचायत समितीची सत्ता टिकविण्याचेही काँग्रेससमोर आव्हान आहे. हीच परिस्थिती कडेगाव तालुक्यात असून, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या नियोजनबध्द खेळीमुळे कडेपूर, वांगी जिल्हा परिषद गटासह चार ते पाच पंचायत समिती गणांच्या जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. पलूस आणि कडेगाव दोन्ही पंचायत समित्यांमध्ये कमळ फुलले तर नवल वाटायला नको, अशीच परिस्थिती आहे.
वाळवा तालुक्यात प्रथमच रयत विकास आघाडीमुळे लक्षवेधी लढती झाल्या आहेत. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ११ जागांपैकी कामेरी, येलूर, पेठ आणि वाळवा अशा चार जागांवर रयत विकास आघाडीच्या नेत्यांनी दावा सांगितला आहे. उर्वरित सहा ते सात जागा राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता असून, एका अपक्षालाही संधी आहे.
मिरज तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ११ जागा असून, त्यापैकी सहा जागा काँग्रेसकडे राहतील, अशी परिस्थिती आहे. भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी, अजितराव घोरपडे गटाला प्रत्येकी एक ते दोन जागा मिळतील, असा अंदाज आहे. काँग्रेसचे नेते माजीमंत्री प्रतीक पाटील, जयश्रीताई पाटील यांची खेळी मिरज तालुक्यात यशस्वी होण्याची चिन्हे आहेत.
खानापूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या तीन जागा असून, नागेवाडी गटातील जागा शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. लेंगरे गटात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेनेला समान संधी दिसत आहे. भाळवणी गटावर शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस आघाडीनेही दावा सांगितल्यामुळे येथील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आटपाडी तालुक्यात माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख भाजपमध्ये आल्यामुळे येथील चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समितीच्या जागा भाजपकडे राहतील, असे पहिल्या टप्प्यातील चित्र होते. अखेरच्या टप्प्यामध्ये भाजपचे गोपीचंद पडळकर आणि देशमुख यांची सर्व मतदारसंघांवरील पकड प्रभावी राहिली नाही. यामुळे करगणी आणि दिघंची गटात शिवसेना चमत्कार करेल, असा अंदाज आहे. खरसुंडी गटातही काँग्रेसने विजयाचा दावा केला असून, आटपाडी गट एकमेव भाजपसाठी सध्या सुरक्षित आहे. उर्वरित जागांवर भाजपचा विजय झालाच तर काठावर होईल, असे बोलले जात आहे.
जत तालुक्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर होती, पण तेथे काँग्रेसच वरचढ ठरण्याची शक्यता आहे. वसंतदादा आघाडी आणि राष्ट्रवादीची काही ठिकाणी आघाडी झाली होती. परंतु, या आघाडीला किती मतदारांनी स्वीकारले, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. भाजपला तीन ते चार जागा मिळण्याची शक्यता असून, जनसुराज्यही एक जागा पटकाविण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात तर्कवितर्क आणि निकालाच्या अंदाजाला उधाण आले आहे. गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वच पक्षांचे, नेत्यांचे, उमेदवारांचे आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
शिराळ््यात चुरस
शिराळा तालुक्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असल्यामुळे चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समितीच्या जागा निवडून येतील, असेच सुरुवातीला चित्र होते. भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या कुटुंबात फूट पाडून जिल्हा परिषदेचे माजी सभापती उदयसिंग नाईक यांच्या सुनेलाच उमेदवारी देऊन दोन्ही काँग्रेससमोर आव्हान उभे केले. त्यामुळे मांगले जिल्हा परिषद गट भाजपकडे जाऊ शकतो. उर्वरित वाकुर्डे बुद्रुक गटातही भाजपने तगडे आव्हान उभे केले आहे. येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दोन ते तीन जागा मिळण्याची शक्यता आहे.
तासगावात काठावरील बहुमत
तासगाव तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अत्यंत चुरशीचा सामना रंगला होता. यामध्ये येळावी, मांजर्डे, चिंचणी या जिल्हा परिषद जागांवर भाजपला, तर सावळज, विसापूर, मणेराजुरी या तीन जागांवर राष्ट्रवादीला संधी दिसत आहे. क्रॉस व्होटिंगमुळे पंचायत समितीची सत्ता अगदी काठावरील बहुमताने राष्ट्रवादीच्या ताब्यात राहण्याचा अंदाज आहे.

Web Title: Nationalist 'number one' in BJP's district?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.