इस्लामपुरात मुख्यमंत्र्यांच्या एन्ट्रीने राष्ट्रवादीच रिचार्ज

By admin | Published: August 13, 2016 11:30 PM2016-08-13T23:30:57+5:302016-08-14T00:25:11+5:30

राजकारण रंगले : भाजपचे विक्रम पाटील यांची ‘एकला चलो रे’ची भूमिका

Nationalist Recharge with the entry of Chief Minister in Islampur | इस्लामपुरात मुख्यमंत्र्यांच्या एन्ट्रीने राष्ट्रवादीच रिचार्ज

इस्लामपुरात मुख्यमंत्र्यांच्या एन्ट्रीने राष्ट्रवादीच रिचार्ज

Next

अशोक पाटील--इस्लामपूर --मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी प्रथमच इस्लामपुरात ‘एन्ट्री’ केली आणि थेट राजारामबापू साखर कारखाना गाठला. राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांना तास-दोन तास वेळ दिला, मात्र केवळ औपचारिकता म्हणून भाजपचे विक्रम पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची ‘कॉलर’ ताठ झाली, तर भाजप आणि घटकपक्षांतील कार्यकर्ते हिरमुसले.
वाळवा, शिराळ्यात राष्ट्रवादीच्या विरोधकांची भूमिका कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, आमदार शिवाजीराव नाईक बजावत आहेत. मात्र जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या गडाला जराही तडा जाऊ दिलेला नाही. मोदी लाटेत जिल्ह्यातील राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले. भाजपची ताकद वाढली. सत्ता गेली तरीही जयंत पाटील यांची क्रेझ कमी झाली नाही.
विधानसभेला शिराळ्यात राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसच्या आघाडीची बिघाडी झाल्यानेच शिवाजीराव नाईक यांना आमदारपदाची संधी मिळाली. भविष्यात पुन्हा आघाडी करून आ. नाईक यांना शह देण्याचा ‘कार्यक्रम’ जयंत पाटील यांनी आखला आहे. नाईक यांना मंत्रीपद मिळाले नाही, यामागे त्यांचाच ‘कार्यक्रम’ असल्याची चर्चा आहे. त्यातच एकेकाळी साखर कारखानदारांविरुद्ध लढणाऱ्या सदाभाऊ खोत यांनी आमदार झाल्यावर राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. त्यानंतरच त्यांना राज्यमंत्रिपदाची लॉटरी लागली!
१९९५ नंतर युती शासनाच्या काळात जयंत पाटील सत्तेपासून दूर होते, मात्र कार्यकर्ते त्यांच्यापासून दूर गेले नाहीत. तत्कालीन मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी इस्लामपूर शहरात जम बसविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विरोधकांची ताकद वाढत होती. मात्र पुन्हा राज्यात आघाडी-कॉँग्रेसची सत्ता आली आणि जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यांना ताकद दिली. त्यानंतर अण्णा डांगे यांनीही राष्ट्रवादीशी घरोबा केल्यामुळे, पाटील यांची मतदार संघासह जिल्ह्यावर पकड मजबूत होत गेली.
मोदी लाटेत त्यांचे समर्थक भाजपमध्ये गेले. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद संपुष्टात येते की काय, अशी चर्चा होती. तथापि राष्ट्रवादीचा इस्लामपूर मतदारसंघ अबाधित ठेवण्यात जयंत पाटील यशस्वी झाले आहेत. शिवाय जिल्ह्यातील भाजपच्या ताकदीमागे त्यांचा हात असल्याचा आरोप विरोधक करतात. याची माहिती असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी इस्लामपूर दौऱ्यात कारखान्यावरील राजारामबापूंच्या पुतळ्यास अभिवादन करून उद्योग समूहाची प्रशंसा केली. यामुळे भाजपचे नव्हे, तर याठिकाणचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत.


सांगली जिल्ह्यातील भाजपमध्ये कोणाचा पायपोस कोणाला नसताना, मोदी लाटेचा साक्षात्कार आणि जयंत पाटील यांची छुपी साथ यामुळे भाजप आमदारांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांचा आदेश मानून दौऱ्याचे नियोजन केले आहे, यात गैर काय?
- रघुनाथदादा पाटील, नेते, शेतकरी संघटना

Web Title: Nationalist Recharge with the entry of Chief Minister in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.