ईव्हीएम यंत्राविरुद्ध देशभर आंदोलन छेडले जाईल, बहुजन मुक्ती पार्टीच्यावतीने सांगलीत इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 11:56 AM2017-11-06T11:56:11+5:302017-11-06T12:04:11+5:30
भाजप सरकार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात (ईव्हीएम यंत्र) घोटाळा करून सत्ता काबीज करण्याचा डाव आखत आहे. त्यांचा हा डाव उधळून लावण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी रस्त्यावर उतरेल. लवकरच ईव्हीएम यंत्राविरुद्ध देशभर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पार्टीच्यावतीने देण्यात आला.
सांगली : भाजप सरकार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात (ईव्हीएम यंत्र) घोटाळा करून सत्ता काबीज करण्याचा डाव आखत आहे. त्यांचा हा डाव उधळून लावण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी रस्त्यावर उतरेल. लवकरच ईव्हीएम यंत्राविरुद्ध देशभर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पार्टीच्यावतीने देण्यात आला.
बहुजन मुक्ती पार्टीच्यावतीने स्टेशन चौकात पश्चिम महाराष्ट्र अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी ईव्हीएम यंत्रातील होत असलेल्या घोटाळ्याबद्दल भाजप सरकारवर टीका केली.
अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी पार्टीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील होते. नवी दिल्लीचे डॉ. राजेंद्र कवठेकर यांच्याहस्ते उद्घाटन झाले. स्वागत व प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अजित पाटील यांनी केले. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी दुपारी कर्मवीर चौकातून दुचाकी रॅली काढण्यात आली.
बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून यापुढे सर्व निवडणुका लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या दीड वर्षात सांगली महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सर्व प्रभागात उमेदवार उभे करुन पार्टीचे नगरसेवक पालिकेत पाठविण्याचा निर्धारही केला. त्यासंदर्भातील तयारीसाठी लवकच बैठक घेण्याचे नियोजन करण्याचे ठरविले.
ईव्हीएम यंत्र बंद करावे, या मागणीसाठी भाजप सरकारविरुद्ध देशभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. तरीही सरकारने हे यंत्र हटविले नाही, तर यंत्राची तोडफोड केली जाईल, असाही इशारा यावेळी दिला.
यावेळी बबन फडतरे (सोलापूर), गौरव पपोरेकर (कोल्हापूर), गोरक्ष बारवकर (पुणे), वैशाली राक्षे, राजेंद्र माळी, अमोल लोंढे, इरफान बारगीर, दत्ताभाऊ नलवडे, बजरंग राजगुरू यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.