वांगीत देशी दारूचे दुकान लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 01:54 PM2020-04-18T13:54:59+5:302020-04-18T13:56:03+5:30
वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथे गुरुवारी रात्रीत सरकारमान्य देशी दारूचे दुकान लुटण्याचा प्रकार घडला असून यामध्ये ५४ बॉक्स, ...
वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथे गुरुवारी रात्रीत सरकारमान्य देशी दारूचे दुकान लुटण्याचा प्रकार घडला असून यामध्ये ५४ बॉक्स, रोकडसह इतर साहित्याची सुमारे सव्वा लाखाची चोरी झाली आहे, अशी फिर्याद दुकानमालक दिलीपराव सूर्यवंशी यांनी शुक्रवारी रात्री उशिरा चिंचणी पोलीस ठाण्यात दिली आहे.
दिलीपराव सूर्यवंशी यांचे वांगीतील गावखाणीशेजारी सरकारमान्य देशी दारूचे दुकान आहे. कोरोना साथीच्या अनुषंगाने लॉकडाऊन असल्याने हे दुकान कित्येक दिवसांपासून बंदच आहे. हा परिसर नागरी वस्तीपासून लांब व निर्मनुष्य आहे. १६ एप्रिल रोजी रात्रीत याठिकाणी अज्ञात चोरट्यांनी उत्पादन शुल्क विभागाने सील केलेल्या शटरचे आणि दरवाजाचे कुलूप तोडून आतील देशी दारूचे ५४ बॉक्स याशिवाय गल्ल्यात असणारी चार हजारांची चिल्लर, दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सात हजार रुपये किमतीची हार्डडिस्क असा किमान सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला आहे. यासंदर्भात अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी करीत आहेत.