सांगलीतील नैसर्गिक नाले, ओतातील अतिक्रमणे हटणार!
By admin | Published: January 10, 2016 12:57 AM2016-01-10T00:57:02+5:302016-01-10T00:59:31+5:30
महापालिकेची तयारी : जुना बुधगाव रस्त्यावर मंगळवारपासून कारवाई करण्याचे प्रशासनाने दिले स्पष्ट संकेत
सांगली : अतिक्रमणविरोधी मोहिमेला आता शनिवारी आणि रविवारच्या सुट्टीचा बे्रक दिला असून, सोमवारपासून पुन्हा कारवाईला सुरुवात होणार आहे. शंभर फुटीवरील उर्वरित अतिक्रमणे हटविल्यानंतर महापालिकेचा मोर्चा जुना बुधगाव रस्त्यावर वळविण्यात येणार आहे. नाले व ओतातील अतिक्रमणे काढण्याची तयारी महापालिकेने केली आहे.
शहरातील बाजारपेठा, मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणविरोधी जोरदार मोहीम जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी राबविल्याने उर्वरित भागातील अतिक्रमण करणाऱ्या लोकांनाही धास्ती वाटू लागली आहे. सांगलीच्या जुना बुधगाव रस्त्यावर विविध व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे केली आहे. नाले व ओतामध्ये भराव टाकून जागा गिळंकृत केल्या जात आहेत. महापुराला निमंत्रण देणारी ही अतिक्रमणे सर्वात धोकादायक बनली आहेत. त्यामुळे या अतिक्रमणांवर हातोडा टाकण्याची गरज होती. महापालिकेने याबाबत गांभीर्याने पावले टाकली असून, त्यासाठीची तयारी केली आहे.
सोमवारी शंभर फुटी रस्त्यावरील उर्वरित अतिक्रमणे हटविल्यानंतर मंगळवारपासून जुना बुधगाव रस्त्यावरील कारवाईला सुरुवात होणार आहे. जुना बुधगाव रस्त्यावर बायपासलगत असलेल्या ओतामध्ये काही व्यावसायिकांनी भर टाकला आहे. याठिकाणी गॅरेज व ट्रकसाठी पार्किंगची अनधिकृत व्यवस्था तयार केली आहे. ओतामध्ये भराव टाकल्यामुळे नाल्यावाटे येणारे पाणी शहरात घुसण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच ही सर्व अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे हटविण्याची गरज होती. त्यादृष्टीने आता महापालिकेने तयारी केली आहे. याठिकाणी रस्त्यावरच दुतर्फा ट्रक उभारण्यात येतात. त्यामुळे या मार्गावरून नागरिकांना जीव मुठीत घेऊनच जावे लागते. केवळ नाले आणि ओतच नव्हे, तर हा मोठा रस्ताही गिळंकृत करण्याचा उद्योग काहींनी सुरू केला आहे. त्यामुळेच अतिक्रमणे वाढत जाऊन हा रस्ताही आता अरुंद बनला आहे. महापालिकेनेच आजअखेर दुर्लक्ष केल्यामुळे ही अतिक्रमणे वाढली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत याठिकाणीही कडक पावले उचलली गेली, तर निश्चितच हा रस्ता सांगली-माधवनगर रस्त्यासाठी खऱ्याअर्थाने पर्यायी रस्ता ठरू शकतो. (प्रतिनिधी)
वाहतुकीसाठी आखली लक्ष्मणरेषा
सांगलीच्या शासकीय रुग्णालयाजवळील खोकीधारकांची अतिक्रमणे हटविल्यानंतर याठिकाणी पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत. या रेषेच्या आतच लोकांना पार्किंग करता येणार आहे. त्यामुळे विक्रेत्यांसाठी ही लक्ष्मणरेषा आहे. ही रेषा ओलांडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक शाखेने दिला आहे.
शनिवारच्या बाजारात पुन्हा बेशिस्तपणा
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगलीच्या बालाजी चौकापासून मारुती चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून हा रस्ता मोकळा केला होता. शनिवारच्या बाजारात पुन्हा विक्रेत्यांचा बेशिस्तपणा दिसून आला. बालाजी चौक ते शहर पोलीस ठाण्यापर्यंत बाजारात विक्रेत्यांनी ये-जा करण्यासाठी पुरेशी जागा ठेवली नव्हती. त्यामुळे दिवसभर वाहतुकीची कोंडी दिसत होती.