बुद्ध पौर्णिमेला मिळणार निसर्गानुभव, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 03:54 PM2023-04-27T15:54:51+5:302023-04-27T17:05:33+5:30
जंगलातील मचाणावर बसून निसर्गप्रेमींना थरारक अनुभव घेता येणार
विकास शहा
शिराळा : सामान्य नागरिकांना रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ काढून निसर्गाची अनुभूती घेता यावी, तेथे राहाणाऱ्या वन्य पशुपक्ष्यांचे मनसोक्त दर्शन घेता यावे, वन्य पशुपक्ष्यांची त्यांच्याच घरात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष खुणांद्वारे ओळख पटविता यावी, रात्रीचे जंगल, वन्यप्राण्यांचे आवाज, निशाचर प्राण्यांची वर्तणूक इत्यादी रंजक माहिती मिळावी या उद्देशाने यावर्षी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातर्फे निसर्गानुभव कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
५ मे बुद्धपौर्णिमेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोयना, बामणोली, चांदोली, ढेबेवाडी आणि हेळवाक या परिक्षेत्रांतील जंगलातील ६०हून अधिक मचाणावर बसून निसर्गप्रेमींना अरण्यवाचनाचा थरारक अनुभव घेता येणार आहे. सामान्य लोकांना वने व वन्यजीव यांच्याबाबत माहिती मिळावी या उद्देशाने वनविभागात मागील काही वर्षांपासून ‘निसर्गानुभव’ कार्यक्रम’सुरू केला आला. जंगलातील नैसर्गिक तसेच कृत्रिम पाणवठ्याजवळ मचाण बांधले आहेत. यात सहभागी होण्यासाठी २५ पासून ३० एप्रिलपर्यंत अर्ज करावे लागणार आहे.
पंधरा नद्यांचा उगम
दि. ५ जानेवारी २०१० रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आला आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ हे ११६५.५७ चौ. किमी आहे. व्याघ्र प्रकल्प हा सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यात येतो. १५ नद्यांचा उगम या जंगलातून होतो.
जैवविविधतेचा खजिना
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग असलेले कोयना वन्यजीव अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान हे युनेस्कोने घोषित केलेले जागतिक नैसर्गिक वारसास्थळ आहे. येथील जैवविविधतेसाठी व्याघ्र प्रकल्प आहे. सस्तन प्राण्यांच्या ३८, पक्ष्यांच्या २४४, फुलपाखरांच्या १२० उभयचरांच्या २२, परिसृपांच्या ४४, गोड्या पाण्यातील मासे ५० आणि वनस्पतींच्या १४५२ प्रजाती येथे आढळून येतात.