झरे परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:30 AM2021-08-19T04:30:26+5:302021-08-19T04:30:26+5:30
आटपाडी : झरे (ता. आटपाडी) येथे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दि. २० ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या बैलगाडी ...
आटपाडी : झरे (ता. आटपाडी) येथे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दि. २० ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीच्या पार्श्वभूमीवर परिसराला अक्षरश: पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. शर्यती रोखण्यासाठी चारशेवर पोलीस आणि शीघ्रकृती दलाच्या दोन तुकड्या तैनात केल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी झरे परिसरातील नऊ गावांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. गुरुवारपासून झरे गावाला जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी बंदी आदेश झुगारून बैलगाडी शर्यतींचे आयोजन केले आहे. विजेत्यांना लाखोंची बक्षिसे देणार असल्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कोणत्याही परिस्थितीत शर्यत होऊ नये, यासाठी काटेकोर नियोजन केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी झरे, पिंपरी बुद्रुक, विभूतवाडी, करूंदीवाडी, पडळकरवाडी, निंबवडे, घाणंद, जांभूळणी, घरनिकी या गावांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. हा आदेश दि. १८ ऑगस्टच्या दुपारी एक वाजल्यापासून दि. २० ऑगस्टच्या रात्री बारा वाजेपर्यंत लागू आहे. या गावांमध्ये वैद्यकीय सेवा, अंत्यविधी अशा अत्यावश्यक बाबी वगळता संचारबंदी लागू केली आहे. या गावांमध्ये बैलगाडीसह त्यांचे चालक-मालक यांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
झरे गावात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांनी गुरुवारी दुपारपासूनच नाकाबंदी केली आहे. सातारा, सोलापूर जिल्ह्यांतून येणाऱ्या सर्व रस्त्यांवरही त्या-त्या जिल्ह्यातील पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. झरे गावात जेथे ही शर्यत होणार आहे, त्या जागेभोवती सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कोट
गोवंश संवर्धन करणे ही घटनेच्या ४८ व्या कलमानुसार सरकारची जबाबदारी आहे. पण राज्य सरकारमध्ये ट्रॅक्टर कंपन्यांचे काही दलाल बसलेले आहेत. ट्रॅक्टरची विक्री वाढली तरच त्यांना फायदा होईल. ट्रॅक्टर विक्रीसाठी सरकार अनुदान देते. मात्र बैल कत्तलखान्याकडे जावेत, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शर्यती सुरू होण्यासाठी तामिळनाडू, कर्नाटक राज्यांनी कायदे केले, मग महाराष्ट्रात हे का शक्य नाही? बैल कापला तर प्राणीमित्र संघटनांना चालते, पण शर्यतीला विरोध केला जातो. बैलांच्या संवर्धनासाठी आयोजित केलेली ही शर्यत कितीही पोलीस बळाचा वापर केला तरी होणारच.
- आमदार गोपीचंद पडळकर
असा आहे बंदोबस्त
एक पोलीस अधीक्षक, एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक, तीन पोलीस उपअधीक्षक, ५० पोलीस अधिकारी, ३५० कर्मचारी, शीघ्रकृती दलाच्या दोन तुकड्या असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.