पलूसमधील नवोदय विद्यालय वादग्रस्तच!
By Admin | Published: December 9, 2014 11:43 PM2014-12-09T23:43:20+5:302014-12-09T23:53:43+5:30
विद्यार्थी, पालकांत अस्वस्थता : दर्जेदार प्रशासन हवे
आर. एन. बुरांडे -पलूस भारत सरकारने १९८६ या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार २८ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५९८ जवाहर नवोदय विद्यालये देशात सुरू केली आहेत. पलूस (जि. सांगली) येथे १९९१ मध्ये जवाहर नवोदय विद्यालय सुरू झाले.
या विद्यालयात इयत्ता सहावीत निवड चाचणी परीक्षेद्वारे प्रवेश देण्यात येतो. शिक्षणाचे माध्यम इयत्ता ८ वीपर्यंत मातृभाषा किंवा विभागीय भाषा असून, त्यानंतर गणित, विज्ञान व इंग्रजी भाषेतून आणि समाजशास्त्र हिंदी भाषेतून शिकविण्यात येते आणि हे विद्यार्थी केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता १0 वी व १२ वीच्या परीक्षांना बसतात.
या विद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना भोजन, गणवेश, निवास आणि वह्या-पुस्तके आदींची मोफत व्यवस्था केली जाते. विशेषत: ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार आधुनिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
पलूसमधील जवाहर नवोदय विद्यालय भव्य व सुंदर इमारतीमध्ये असून, संपूर्ण परिसर निसर्गरम्य आहे. परंतु निसर्गरम्य व सुंदर इमारतीत मुलाला पाठविले म्हणजे त्याचे शिक्षण चांगल्याप्रकारे होते, असे म्हणणे धाडसाचे होईल. कारण त्या विद्यालयाचे प्रशासनही अत्यंत दर्जेदार असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
पलूसच्या नवोदय विद्यालयाला जे प्राचार्य लाभतात, त्यांच्या वागण्याच्या पध्दतीवरून त्या विद्यालयाचा दर्जा ठरतो. या विद्यालयाच्या २३ वर्षांच्या कालावधित अनेक वादग्रस्त प्राचार्य होऊन गेले, तर काही चांगलेसुध्दा आले. गेल्या काही वर्षात या नवोदय विद्यालयाचा दर्जा खालावला होता. रॅगिंगचे प्रकार कधी नव्हे ते सुरू झाले होते. लहान वयातील विद्यार्थ्यांच्या समजण्यापलीकडे असलेले हे प्रकार त्यांना घाबरवून टाकत होते. तसेच जेवणाचा दर्जा सुध्दा चांगला नव्हता. या सर्व प्रकारामुळे आपल्याला त्रास होईल, म्हणून मुले पालकांना सांगत नव्हती आणि पालक आपल्या मुलांना नवोदय विद्यालयात त्रास होईल म्हणून गप्प बसत असत.
आपल्या पोटच्या गोळ्याला सर्वांपासून तोडून संपूर्ण अनोळखी जगात पाठवून आपण आपल्या मुलांच्या सर्वोत्कृष्ट शिक्षणाची सोय केली, याची शेखी मिरवत काही पालक धन्यता मानतात. परंतु आपला मुलगा कोणत्या दिव्यातून जातोय, याचा विचार असे पालक करताना दिसत नाहीत.
सचिन जावीर याने विद्यालयात काही ११ व १२ वीचे विद्यार्थी कसे त्रास देतात, हे आपल्या वहीत लिहून ठेवले होते. परंतु त्याच्या वडिलांनी त्याची दखल वेळेत घेतली असती, तर रॅगिंगमुळे आत्महत्या झाली नसती. दुसऱ्या एका गोष्टीचा येथे विचार केला पाहिजे की, सचिन जावीर हा इ. ९ वीमध्ये प्रवेश घेऊन विद्यालयात आला होता. एकदम केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाचा अभ्यासक्रम समोर आल्याने आणि तोही इंग्रजी आणि हिंदी भाषेत असल्याने त्याने हाय खाल्ली. हे त्याच्या गुणावरून समजते. त्याला पहिल्या सत्रात मिळालेले गुण इंग्रजी ७१/९0, हिंदी ८२/१00, मराठी ८२/१00, गणित ३३/१00, सायन्स ३६/१00, सामाजिक शास्त्र ४४/१00 यावरून त्याला गणित, सायन्स आणि सामाजिक शास्त्रात एकदम कमी गुण मिळाल्याचे दिसते. म्हणून तो मित्रांना केंद्रीय बोर्डाची परीक्षा आपणाला अवघड जाणार म्हणत होता. त्यामुळे नाराज होऊन त्याने हे कृत्य केले असावे, असाही विचार करणे भाग पडत आहे.
येथे दीड वर्षापासून कार्यरत असलेले अशोक साळी हे कार्यक्षम प्राचार्य असून, उत्तम प्रकारचे प्रशासन त्यांनी आणले आहे. खालावलेला दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू असताना ही घटना घडली आहे. यामुळे नवोदय विद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनाचा हळूवार विचार करून त्यांना मानसिक धीर देण्यासाठी प्रत्येक जवाहर विद्यालयात समुपदेशकाची नेमणूक करावी, अशी मागणी पालकांतून होत आहे. (वार्ताहर)
समुपदेशकाच्या नेमणुकीची मागणी
गेल्या काही वर्षात या नवोदय विद्यालयाचा दर्जा खालावला होता. रॅगिंगचे प्रकार कधी नव्हे ते सुरू झाले होते. लहान वयातील विद्यार्थ्यांच्या समजण्यापलीकडे असलेले हे प्रकार त्यांना घाबरवून टाकत होते. तसेच जेवणाचा दर्जासुध्दा चांगला नव्हता. या सर्व प्रकारामुळे आपल्याला त्रास होईल, म्हणून मुले पालकांना सांगत नव्हती आणि पालक आपल्या मुलांना नवोदय विद्यालयात त्रास होईल म्हणून गप्प बसत असत. पण आता घडलेल्या या दुर्दैवी प्रसंगाने विद्यार्थ्यांचे मनोधैर्य खालावले असून, त्यांना मानसिक धीर देण्यासाठी प्रत्येक जवाहर विद्यालयात समुपदेशकाची नेमणूक करावी, अशी मागणी पालकांतून होत आहे.