नवाब मलिक यांचा सांगलीत निषेध
By admin | Published: April 24, 2016 10:52 PM2016-04-24T22:52:27+5:302016-04-24T23:53:54+5:30
भाजपची निदर्शने : पंकजा मुंडे यांच्यावरील टीकेने संताप
सांगली : भाजपच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा ‘दारूवाली बाई’ असा उल्लेख केल्याबद्दल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा भाजपच्यावतीने रविवारी सांगलीत निषेध करण्यात आला. त्यांच्या प्रतिमेची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड काढून जोरदार निदर्शने करण्यात आली. सांगलीच्या विश्रामबाग चौकात हे आंदोलन पार पडले. यावेळी भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा नगरसेविका स्वरदा केळकर म्हणाल्या की, मलिक यांनी अत्यंत बेजबाबदारपणे व खालच्या पातळीवर जाऊन मुंडे यांच्यावर टीका केली आहे. अशाप्रकारची टीका आम्ही खपवून घेणार नाही. राजकारणात शब्दांचे भान ठेवून टीका केली पाहिजे. मलिक यांचे वक्तव्य सर्वच महिला वर्गासाठी अपमानास्पद आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करीत आहोत. तातडीने त्यांनी याप्रकरणी माफी मागावी, अन्यथा युवा मोर्चाच्यावतीने त्यांच्या तोंडाला आम्ही काळे फासू, असा इशारा त्यांनी दिला.
गाढवावर प्रतिमा ठेवल्यानंतर पोलिसांनी लगेच आंदोलनकर्त्यांकडून त्या काढून घेतल्या. यावेळी कार्यकर्ते व पोलिसांत गदारोळ झाला. पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी प्रतिमा पोलिसांच्या ताब्यात दिल्या. आंदोलनामुळे काही काळ विश्रामबाग चौकातील वाहतूक विस्कळीत झाली होती.
आंदोलनात प्रकाश बिरजे, श्रीकांत शिंदे, हणमंत पवार, धनेश कातगडे, संजय कुलकर्णी, विशाल मोरे, कौस्तुभ कुलकर्णी, पृथ्वीराज पाटील, मकरंद म्हामुलकर, चंद्रकांत घुणके, संतोष सरगर, प्रशांत सुतार, अभिजित सोनवणे, रवी बाबर, किरण पाटील, छाया हाक्के, उषा गायकवाड आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
सांगलीत रविवारी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाच्यावतीने उपाध्यक्षा स्वरदा केळकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली.