नायकवडींच्या निवडीने उलटसुलट चर्चा सुरू
By admin | Published: July 17, 2014 11:31 PM2014-07-17T23:31:52+5:302014-07-17T23:40:19+5:30
पुन्हा पद : विधानसभेचे गणित
मिरज : महापालिका निवडणुकीत ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका करणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते इलियास नायकवडी यांची प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आता उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रदेश कमिटी बरखास्त करून प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची नेमणूक केली. प्रदेश कार्यकारिणीत पुन्हा एकदा नायकवडी यांची प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. त्यांची अल्पसंख्याक विभाग पश्चिम महाराष्ट्र व कोकणसाठी प्रभारी म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण विभागातून अल्पसंख्याकांना राष्ट्रवादीसोबत जोडण्याचे काम नायकवडी यांच्यावर सोपविण्यात आले आहे.
महापालिका निवडणुकीत जयंत पाटील यांच्याशी मतभेद झाल्याने नायकवडी यांनी काँगे्रसला साथ दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे ‘मराठ्यांची आरएसएस’ व ‘न्यू क्रिमिनल पार्टी’ असल्याची टीका केली होती; मात्र आता पुन्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर महापालिका निवडणुकीतील जयंत पाटील यांच्याशी मतभेद तात्कालीक होते, पक्षनेते शरद पवार यांच्या उपस्थितीत मतभेद संपुष्टात आल्याचे इलियास नायकवडी यांनी सांगितले.
नायकवडी यांच्या निवडीने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मध्यंतरी राजारामबापूंच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमावेळीही जयंतरावांबरोबर त्यांनी इस्लामपूरमध्ये हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांच्यातील मतभेद संपुष्टात आल्याने नायकवडींना संधी देण्यात आली असावी, असा तर्क लावला जात आहे. (वार्ताहर)