राष्ट्रवादी-भाजप नेत्यांची खलबते
By admin | Published: July 12, 2015 11:23 PM2015-07-12T23:23:44+5:302015-07-13T00:32:13+5:30
जागा वाटपाचे त्रांगडे : तासगाव बाजार समितीसाठी जयंत पाटलांची भूमिका ठरणार निर्णायक
दत्ता पाटील - तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत मंगळवारी (ता. १४) आहे. याचदिवशी निवडणुकीच्या रणांगणाचे नेमके चित्र स्पष्ट होणार असले तरी, राष्ट्रवादी आणि भाजपची आघाडी जवळपास निश्चित मानली जात आहे. काँग्रेसलाही या आघाडीत सामावून घेण्याबाबत चर्चा सुरु आहे. सद्यस्थितीत राष्ट्रवादी आणि भाजपच्या जागा वाटपाचे घोडे सन्मानजनक तोडग्यावर अडले आहे. याबाबत आमदार जयंत पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक १ आॅगस्टला होणार आहे. यावेळी पहिल्यांदाच २४४ इतके उच्चांकी अर्ज दाखल झाले आहेत. बाजार समितीवर मतदारांचे प्राबल्य असणारे राष्ट्रवादी आणि भाजप हे दोनच पक्ष आहेत. गतवेळच्या निवडणुकीत भाजपचे नेते खासदार संजय पाटील राष्ट्रवादीत होते. त्यावेळी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या गटाला १२ आणि संजय पाटील यांच्या गटाला ७ अशा पध्दतीने जागावाटप झाले होते.
या निवडणुकीतही कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीपासूनच भाजप आणि राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत चर्चेला सुुरुवात झाली होती. सूतगिरणीच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी माघार घेऊन राष्ट्रवादीसोबत आघाडीचे संकेतही दिले होते. आता अर्ज मागे घेण्याची मुदत जवळ आल्यामुळे आघाडी की स्वबळावर लढायचे, याबाबत दोन्ही पक्षांत चर्चेला वेग आला आहे.
राष्ट्रवादी आणि भाजपच्या आघाडीचा निर्णय अद्याप झाला नसला तरी, दोन्ही पक्षांचे घोडे सन्मानजनक तोडग्यावरच अडल्याचे स्पष्ट होत आहे. नेमक्या कोणी किती जागा घ्यायच्या, यावर दोन्ही पक्षात खलबते सुरू आहेत. तसेच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसला दोन जागा देण्याबाबतही चर्चा सुरु आहे.
जागावाटपाबाबत चर्चा सुरु असेल, तर दोन्ही पक्षांना आघाडी मान्य आहे, हे जाहीर होते. आता राहिला प्रश्न सन्मानजनक तोडग्याचा. तर भाजपच्या नेत्यांशी सख्य असणारे आणि राष्ट्रवादीचे तालुक्याचे पालकत्व स्वीकारलेले नेते आमदार जयंत पाटील यांची भूमिका आघाडीसाठी निर्णायक ठरणार आहे. आमदार पाटील यांनी ठरवले, तर बाजार समितीसाठी आघाडीचा फॉर्म्युला निश्चित होऊन ही निवडणूक बिनविरोध किंवा एकतर्फी होऊ शकते. याबाबतचे चित्र मात्र मंगळवारीच स्पष्ट होणार आहे.
भाजपचे दबावतंत्र
भाजपची राष्ट्रवादीसोबत आघाडी करायची तयारी आहे. मात्र अपेक्षित जागा मिळाल्या तरच आघाडी करायची, अन्यथा स्वबळावर लढायचे, अशी भूमिका भाजपची आहे. अपेक्षित जागा मिळविण्यासाठी भाजपने रविवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन स्वबळाचे बिगुल वाजवून राष्ट्रवादीवर दबावतंत्राचा वापर केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
भाजपकडून १०-७-२ जागा वाटपाचा प्रस्ताव
गतवेळच्या निवडणुकीतील आघाडीचा पायंडा कायम राहावा. मागील निवडणुकीप्रमाणेच १२ जागा राष्ट्रवादीने घ्याव्यात आणि ७ जागा भाजपला द्याव्यात. बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना सामावून घ्यायचे असेल तर, राष्ट्रवादीच्या २ जागा द्याव्यात.
राष्ट्रवादी काँग्रेसचा
१३-४-२ चा फॉर्म्युला
गत निवडणुकीवेळी खासदार गट राष्ट्रवादीत होता. बाजार समितीच्या मतदार संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यामुळे १३ जागा राष्ट्रवादीने घ्याव्यात, ६ जागा भाजपने घ्याव्यात. बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना आघाडीत घ्यायचे असेल तर, भाजपच्या २ जागा द्याव्यात.