तासगावमध्ये राष्ट्रवादीचा भाजपला दे धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:01 AM2018-04-13T00:01:21+5:302018-04-13T00:01:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
तासगाव : तासगाव नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ६ च्या पोटनिवडणुकीत राष्टÑवादीच्या सादिया शेख या १८० मतांनी विजयी झाल्या. त्यांनी भाजप पुरस्कृत उमेदवार तायरा मुजावर यांचा पराभव केला. या विजयाने राष्टÑवादीला पुन्हा संधी मिळाली असून भाजपला जोरदार धक्का बसला आहे.
राष्टÑवादीच्या तत्कालीन नगरसेविका रेहाना मुल्ला यांच्या जात प्रमाणपत्रावर भाजपचे पक्षप्रतोद अनिल कुत्ते यांनी हरकत घेतली होती. त्यामुळे मुल्ला यांचे नगरसेवकपद रद्द झाले होते. या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने थेट कमळ चिन्हावर उमेदवारी न देता, नगरसेवक जाफर मुजावर यांची बहीण तायरा मुजावर यांना भाजप पुरस्कृत उमेदवारी दिली होती, तर राष्टÑवादीकडून नवख्या सादिया शेख यांना उमेदवारी दिली होती.
भाजपकडून राष्टÑवादीला शह देण्यासाठी नगरसेवक पद रद्द करण्याकरिता पाठपुरावा झाला होता. त्यातच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी झाली होती. याची जिल्हाभर चर्चा झाली होती. त्यामुळे या प्रभागातील निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झाले होते.
या निवडणुकीत मुजावर यांना ७५०, तर शेख यांना ९३० मते पडली, तर नोटाला २२ मते मिळाली. राष्टÑवादीच्या शेख यांनी मुजावर यांचा १८० मतांनी पराभव केला. या निवडणुकीकडे मतदारांनी पाठ फिरविल्यामुळे ५९.६९ टक्के मतदान झाले होते.
गुरुवारी निकाल काय लागणार, याची धाकधूक दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना होती. मात्र मारामारीच्या प्रकरणामुळे गुन्हे असल्याने प्रमुख कार्यकर्ते गायब होते. सकाळी दहा वाजता तासगाव तहसील कार्यालयातील मतमोजणी कक्षात कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश दंडिले स्वत: मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. दहा वाजता मतमोजणी सुरु झाली.
राष्टÑवादीचे मताधिक्य घटले
वर्षभरापूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीत प्रभाग ६ मधून राष्टÑवादीचे दोन्ही उमेदवार शहरातील उच्चांकी मताधिक्याने विजयी झाले होते. या प्रभागात मुस्लिम व्होट बँक मोठी असल्याने हा प्रभाग राष्टÑवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पोटनिवडणुकीत राष्टÑवादीच्या उमेदवाराचा विजय झाला असला तरी, मताधिक्यात मात्र घट झाल्याचे चित्र आहे.