...तर दोघांनी पळून जावून लग्न करावे; प्रकाश आंबेडकर यांच्या टीकेला जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर
By शीतल पाटील | Published: October 2, 2023 10:05 PM2023-10-02T22:05:22+5:302023-10-02T22:06:02+5:30
इंडिया आघाडीत सामील होण्याच्या मुद्दावरून वंचित बहुजन आघाडीला बाजूला ठेवण्यात आले आहे.
शीतल पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा सुरू असतानाच डाॅ. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठविली आहे. इंडिया आघाडीत सहभागी होण्यास दोन भडजी आडवे येत असल्याचा आरोप केला होता. त्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर देत दोघेजण लग्नाला उत्सूक असतील आणि भडजी आडवे येत असतील तर पळून जावून लग्न करावे, असा टोला लगाविला.
इंडिया आघाडीत सामील होण्याच्या मुद्दावरून वंचित बहुजन आघाडीला बाजूला ठेवण्यात आले आहे. अद्याप त्याबाबत निर्णय झालेला नाही. त्यात ठाकरे गट आणि वंचित आघाडीच्या युतीची चर्चा राज्यभर सुरू आहे. मध्यंतरी ठाकरे व आंबेडकर एकाच व्यासपीठावर आले होते. आंबेडकर यांनी निवडणुकीबाबत शिवसेनेशी चर्चा झाली आहे. लग्नाची तारीख ठरली असली तरी दोन भडजी आडवे येत आहेत. एक राष्ट्रवादी तर दुसरा काँग्रेस असल्याची टीका केली होती.
त्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीत प्रत्युत्तर दिले. पाटील म्हणाले की, दोघेही लग्नाला उत्सूक आहेत. त्यांचा साखरपुडा झाला असेल आणि भटजी अडथळे आणत असतील तर पळून जाऊन लग्न करावे. इंडिया आघाडीत सामील होणाऱ्या पक्षाचे आम्ही स्वागतच करू. भाजला विरोध करणे हाच मुख्य उद्देश आहे. पण आघाडीची ध्येयधोरणे सहभागी पक्षांना मान्य करावी लागतील. डाॅ. आंबेडकर सकारात्मक असतील तर त्यांचे स्वागतच आहे. त्यांची उद्ध्व ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. ठाकरे आम्हाला सांगतील. भाजपला विरोध करणाऱ्याला कुणालाही आम्ही टाळणार नाही, असेही पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांकडेच राहील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? याबाबत निवडणूक आयोगाकडे शुक्रवारी (दि. ६) सुनावणी होणार आहे. तेथे आमच्या पद्धतीने आमची बाजू मांडू. देशभरात २३ राज्यांत राष्ट्रवादीचे अस्तित्व आहे. त्यातील १९ राज्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला आहे. पक्षकार्यकर्त्यांचे केडर शरद पवारांसोबत मताधिक्याने आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे. पक्ष हा आमदारांचा नसून कार्यकर्त्यांचा असतो. तो कार्यकर्त्यांचाच आणि पर्यायाने शरद पवार यांच्याकडेच राहील.