राष्ट्रवादीचे नेते कमलाकर पाटील यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:28 AM2021-04-20T04:28:22+5:302021-04-20T04:28:22+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सांगली : राष्ट्रवादीचे सांगली विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष कमलाकर भीमराव पाटील (वय ५४) यांचे रविवारी रात्री ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राष्ट्रवादीचे सांगली विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष कमलाकर भीमराव पाटील (वय ५४) यांचे रविवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने जिल्ह्याच्या राष्ट्रवादीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना धक्का बसला.
त्यांना श्वास घेताना त्रास होऊ लागल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच रविवारी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कमलाकर पाटील हे प्रदीर्घ काळ सांगलीच्या राजकारणात सक्रिय होते. दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काँग्रेसमध्ये अनेक वर्षे काम केले. त्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला.
गेल्या अनेक वर्षांपासून सांगली विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष म्हणून ते राष्ट्रवादीत कार्यरत होते. जयंत पाटील यांचे ते निकटवर्तीय होते. सांगली विधानसभा व महापालिकेची निवडणूकही त्यांनी लढविली होती. महापालिका क्षेत्रातील पक्षाच्या प्रत्येक कार्यात ते अग्रेसर होते. सांगली विधानसभा क्षेत्रातील पक्षवाढीत त्यांनी मोठे योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना धक्का बसला. पक्षाच्या वतीने त्यांना आदरांजली वाहण्यात आली. मिरजेत सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.