सांगलीत राष्ट्रवादीच्या नेत्याची निर्घृण हत्या, आठवड्यातील दुसरी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 09:23 AM2020-02-07T09:23:34+5:302020-02-07T09:30:25+5:30
एकाच आठवड्यामध्ये दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची हत्या झाल्यामुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सांगली : सांगलीतील राष्ट्रवादीचे नेते आणि माजी पंचायत समिती सभापती मनोहर पाटील यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
गुरुवारी रात्री आठच्या सुमारास कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग येथे काही अज्ञातांनी धारधार शस्त्रांनी मनोहर पाटील यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात मनोहर पाटील गंभीर जखमी झाले. यानंतर हल्लेखोर पसार झाले. दरम्यान, येथील स्थानिकांनी मनोहर पाटील यांना तातडीने मिरज येथील मिशन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान गुरुवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून तेथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हत्येप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचा प्रााथमिक अंदाज आहे. तसेच, याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मनोहर पाटील हे कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोली गावचे रहिवाशी होते. या गावचे ते उपसरपंच राहिले होते. 2017 मध्ये पंचायत समिती सदस्यपदाची निवडणूक त्यांनी लढवली आणि ते विजयी देखील झाले होते. कवठेमहांकाळ पंचायत समिती सभापती पदही त्यांनी भूषवलं होतं. सध्या मनोहर पाटील हे कवठेमहांकाळ येथील महाकाली साखर कारखान्याचे संचालक होते.
दरम्यान, चार दिवसांपूर्वी पलूस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस नेते आनंदराव पाटील यांची हत्या झाली होती. आनंदराव पाटील यांच्या डोक्यात वार करून हल्लोखोर पसार झाले होते. त्यामुळे एकाच आठवड्यामध्ये दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची हत्या झाल्यामुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.