'आमदारकीचा गर्व असेल, तर राजीनामा देऊन मैदानात या'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 12:28 PM2022-05-09T12:28:51+5:302022-05-09T12:29:44+5:30

शिवसेनेच्या मतदारसंघात लुडबुड चालू देणार नाही असे म्हणताय, तर मग राष्ट्रवादीच्या विटा नगर परिषदेत तुमची लुडबुड कशासाठी?

NCP leader Vaibhav Patil challenges Shiv Sena MLA Anil Babar | 'आमदारकीचा गर्व असेल, तर राजीनामा देऊन मैदानात या'

'आमदारकीचा गर्व असेल, तर राजीनामा देऊन मैदानात या'

Next

विटा : सन २०१९ मध्ये आम्ही अपक्षाऐवजी पक्षाच्या चिन्हावर लढलो असतो, तर त्याचवेळी आमदार झालो असतो. आम्ही आमच्या काही मित्रांच्या भरवशावर व शब्दावर अपक्ष लढलो; पण तुम्ही वरिष्ठ पातळीवरून त्यांच्यावर राजकीय दबाव आणून कपटाने निवडणूक जिंकली आणि नेहमीप्रमाणे त्या मित्रांनाही तुम्ही पुन्हा एकदा फसवले. तुम्हाला आमदारकीचा एवढा गर्व असेल, तर आमदारकीचा राजीनामा द्या व मैदानात या, असे आव्हान राष्ट्रवादीचे नेते वैभव पाटील यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आ. अनिल बाबर यांना रविवारी विटा येथे पत्रकार परिषदेत दिले.

वैभव पाटील म्हणाले, महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या आघाडी शासनामध्ये राष्ट्रवादी महत्त्वाचा घटक आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघातील वंचित गावांच्या शेती पाण्याचा प्रश्न जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे वारंवार मांडला. त्या मागणीला मंत्री पाटील यांनी विनाविलंब प्रतिसाद देत टेंभू योजनेच्या ६ अ व ६ ब या टप्प्यांना मंजुरी दिली.

आम्ही याचा आनंद साजरा करीत पेढे वाटले, तर तुमच्या पोटात का दुखले, ते खानापूरच्या जनतेला समजले नाही. वंचित शेतकऱ्यांची ही प्रलंबित मागणी मान्य करा, आम्ही हत्तीवरून मिरवणूक काढू, असे सांगितले होते. मग तुम्हाला का वाईट वाटते.

आमदारकीचा अहंकार एवढा बाळगू नका, तुम्ही एकदा नव्हे, तर तीन वेळा पराभूत झाला आहात व सद्य:स्थितीतही आम्ही नव्वद हजार लोकांचे प्रतिनिधित्व करतो. हा इतिहास एवढ्यात विसरू नका. आम्ही जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आघाडी धर्माचे पालन करण्यासाठीच आम्ही जिल्हा बँकेत आमचे उमेदवारी अर्ज काढून तुम्हाला बिनविरोध निवडून दिले हे विसरू नका. यावेळी ॲड. बाबासाहेब मुळीक, सचिन शिंदे, सुशांत देवकर, अविनाश चोथे उपस्थित होते.

मग विटा नगर परिषदेत लुडबुड कशासाठी?

वैभव पाटील म्हणाले, शिवसेनेच्या मतदारसंघात लुडबुड चालू देणार नाही असे म्हणताय, तर मग राष्ट्रवादीच्या विटा नगर परिषदेत तुमची लुडबुड कशासाठी? विटा नगर परिषदेत तुम्ही वारंवार करीत असलेला हस्तक्षेप, नगर परिषद अधिकाऱ्यांना दमदाटी व कार्यकर्त्यांच्या अडवणुकीबाबतही उत्तर द्यायला पाहिजे होते. ते न देता सोयीचे आरोप करू नका. आता या लुडबुडीबद्दल आम्हीही मुख्यमंत्री व आघाडीच्या प्रमुखांकडे तक्रार करु.

Web Title: NCP leader Vaibhav Patil challenges Shiv Sena MLA Anil Babar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.