राष्ट्रवादी-मित्रपक्षांचे सरकार आणू : जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 12:13 AM2018-05-03T00:13:26+5:302018-05-03T00:13:26+5:30
इस्लामपूर : राज्यात जातीयवादी सरकार सत्तेवर आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून त्यांच्या चुकांवर बोट ठेवण्याचे काम केले आहे. राष्ट्रवादीचा प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करताना राज्यात पुन्हा समता अन् सर्वसामान्य बहुजन समाजाचा सन्मान करणारे राष्ट्रवादी-काँग्रेस आणि मित्र पक्षांचे सरकार आणू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
आमदार पाटील यांचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर इस्लामपूर शहरात बँड-बेंजो, ढोल-ताशांचा कडकडाट आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषी स्वागत झाले. शेकडो आकर्षक स्वागत कमानी व भव्य मिरवणुकीने जंगी स्वागत करण्यात आले.
ते म्हणाले, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि सर्वच नेत्यांनी माझी एकमताने निवड केली. प्रतिकूल परिस्थिती असताना ही जबाबदारी आली आहे. गेल्या तीस वर्षांपासून मला ताकद देणाऱ्या तुम्हा सर्वांच्या बळावर राज्यात राष्ट्रवादीला भक्कम करणार आहे. देशात अल्पसंख्याक आणि दलितांवर अन्याय सुरु आहे. जातीय भावनांचा उद्रेक करून सत्ता टिकवण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरु आहेत. अशावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीने वाटचाल करून जनतेचा विश्वास संपादन करू. राज्यातील जनतेला पुन्हा एकदा स्वच्छ आणि पारदर्शी प्रशासन देण्यासाठी कटिबद्ध राहू.
आ. पाटील यांच्या स्वागतासाठी लोक दुपारी ५ पासूनच इस्लामपूर पंचायत समिती परिसरात जमा होऊ लागले होते. आ. पाटील यांची उघड्या ट्रॅक्टरमधून मिरवणूक सुरू झाली. ही मिरवणूक झरी नाका, आझाद चौक, लाल चौक, गांधी चौक, यल्लाम्मा चौकातून कचेरी चौकात आली. या मार्गावरील रस्तेनगर्दीने फुलून गेले होते. या मिरवणुकीत त्यांच्यासमवेत त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील, राजवर्धन पाटील, दिलीपराव पाटील, विजय पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, खंडेराव जाधव, संग्राम पाटील, शहाजी पाटील होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजय पाटील यांनी स्वागत केले.
यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, जिल्हाध्यक्ष विलासराव पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, माणिकराव पाटील, पी. आर. पाटील, विनायक पाटील, प्रा. शामराव पाटील, जनार्दन पाटील, विष्णुपंत शिंदे, विजयभाऊ पाटील, भीमराव पाटील, सभापती विश्वासराव पाटील, सभापती सचिन हुलवान, नेताजी पाटील, कृष्णाचे संचालक संजय पाटील, देवराज पाटील, चिमण डांगे, पीरअली पुणेकर आदी उपस्थित होते.
विक्रम पाटील यांना दिल्या शुभेच्छा
मिरवणूक संभाजी चौकात आली असता भाजपचे विक्रम पाटील भाजपचे उपाध्यक्ष सोमनाथ फल्ले यांच्या दुकानात बसले होते. जयंत पाटील यांनी त्यांना बोलावून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
पंचायत समिती आवारात कार्यकर्त्यांनी गोंधळ केल्याने चोरट्यांनी हात धुऊन घेतले. काही नेत्यांच्या मोबाईल आणि रोख रकमेवर हात मारला.