लाड-देशमुखाच्या राजकारणात राष्ट्रवादी जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:17 AM2021-07-22T04:17:34+5:302021-07-22T04:17:34+5:30
१)अरुण लाड २) पृथ्वीराज देशमुख देवराष्ट्रे : राजकारणात कधी आजचे मित्र उद्याचे शत्रू होतील व आजचे शत्रू उद्याचे मित्र ...
१)अरुण लाड
२) पृथ्वीराज देशमुख
देवराष्ट्रे : राजकारणात कधी आजचे मित्र उद्याचे शत्रू होतील व आजचे शत्रू उद्याचे मित्र होतील, हे सांगता येत नाही. असेच काही चित्र सध्या कडेगाव-पलूस तालुक्याच्या राजकारणात घडत आहे. येथे लाड-देशमुख गटाच्या राजकारणात राष्ट्रवादी जोरात आहे, तर अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भाजप कोमात गेली आहे.
क्रांती कारखाना व आमदारकीच्या माध्यमातून अरुण लाड यांनी मतदार संघात कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभी करत, देशमुखांच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा सपाटा लावला आहे. असे वरवर दिसत असले, तरी देशमुखांना घायाळ करण्यासाठी लाडांच्या खाद्यावर जयंत पाटील यांनी की, विश्वजीत कदम यांनी बंदूक ठेवली आहे, हा खरा शोधाचा विषय आहे.
गेल्या वीस त पंचवीस वर्षांपासून हातात हात घालून काम करणारे देशमुख व लाड यांचे मित्रत्वाचे संबंध जगजाहीर होते, पण विधानपरिषद निवडणुकीत देशमुख विरुद्ध लाड अशी सरळ लढत झाली. हे मित्रत्वाचे नाते तुटले आणि राजकीय शत्रुत्व निर्माण झाले. देशमुखांचे वर्चस्व असलेल्या परिसरात लाडांनी कधीही डोकावूनही पाहिले नव्हते, पण या महिनाभर मूठभर कार्यकर्त्यांच्या जोरावर कडेगाव-पलूस तालुक्यात भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादीत डेरेदाखल केले आहेत. काही ठिकाणी काँग्रेस कार्यकर्तांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने कदम गटालाही धक्का बसला आहे.
कडेगाव तालुक्यात गेल्या पाच वर्षात राष्ट्रवादीचा गट तयार करण्यासाठी शरद लाड यांनी अनेक बैठका घेतल्या, पण तितकेशे यश आले नही. आता अरुण लाड आमदार झाले आणि गटाची बांधणी जोरदार सुरू झाली आहे.
चौकट
विकासकामांवरही जोर
अरुण लाड हे आमदार झाल्यापासून त्यांनी कडेगाव तालुक्यात २.३३ कोटी आमदार फंड वेगवेगळ्या गावात दिला आहे. क्रांती कारखान्याच्या माध्यमातून ऊसबिले वेळेवर देत असल्याने नेतृत्त्वावर विश्वास वाढला आहे. युवानेते शरद लाड यांनी मोठा जनसंपर्क वाढविला असल्याने लाड गटाची म्हणजेच राष्ट्रवादीची कडेगाव व पलूसच्या राजकारणावर पकड भक्कम होताना दिसत आहे.