काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या बैठका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:25 AM2020-12-22T04:25:44+5:302020-12-22T04:25:44+5:30
देवराष्ट्रे : सोनहिरा परिसर हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड आमदार झाल्याने येथील राष्ट्रवादी ...
देवराष्ट्रे : सोनहिरा परिसर हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड आमदार झाल्याने येथील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत हत्तीचे बळ निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्येक गामपंचायतीत आपला वेगळा गट स्थापन करण्यासाठी सोनहिरा परिसरातील राष्ट्रवादीच्या मातब्बर नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे.
सोनहिरा परिसरातील रामापूर, सोनकिरे, शिरसगाव, अंबक या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. यापूर्वी शिरसगाव, अंबक, सोनकिरे ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व होते, तर रामापूरमध्ये भाजप - राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरी स्थानिक राजकारण हे वेगळे असते. त्यामुळे अनेक ठिकांणी मित्रच शत्रू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
स्थानिक राजकारण गट निर्माण करण्यासाठी लाड गटाने चांगली फिल्डिंग लावली आहे. देवराष्ट्रे जिल्हा परिषद गटात कमी झालेली भाजपची ताकद व काँग्रेसची वाढलेली जवळीक यांचा पुरेपूर फायदा उठविण्यासाठी राष्ट्रवादीने बैठकांचा धडाका लावला आहे. यासाठी पथ्वीराज कदम, नारायण पाटील, वैभव पवार, अंकुश यादव, संदेश जाधव, टी. एम. जाधव यांनी शिरसगाव येथे बैठका घेतल्या आहेत.
चौकट
रामापूर ग्रामपंचायत निवडणूक राष्ट्रवादीने यापूर्वी भाजपबरोबर युती करून लढविली आहे. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी आघाडी धर्म पाळणार का, हा चर्चेचा विषय बनला आहे. सोनकिरे ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी वेगळे पॅनेल उभा करण्याच्या तयारीत आहे.