राष्ट्रवादीची बाजार समिती, जिल्हा परिषदेसाठी मोर्चेबांधणी, काँग्रेस-भाजप अंतर्गत वादातच व्यस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 01:21 PM2022-02-11T13:21:41+5:302022-02-11T13:22:24+5:30

जिल्ह्यातील दहा पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाल १३ मार्चला तर जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाल २१ मार्चला संपत आहे

NCP prepares for Sangli Zilla Parishad, Panchayat Samiti elections | राष्ट्रवादीची बाजार समिती, जिल्हा परिषदेसाठी मोर्चेबांधणी, काँग्रेस-भाजप अंतर्गत वादातच व्यस्त

राष्ट्रवादीची बाजार समिती, जिल्हा परिषदेसाठी मोर्चेबांधणी, काँग्रेस-भाजप अंतर्गत वादातच व्यस्त

googlenewsNext

अशोक डोंबाळे

सांगली : जिल्हा परिषद, दहा पंचायत समित्या आणि सांगली बाजार समितीची निवडणूक येत्या दोन महिन्यात आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील काँग्रेस, भाजप, शिवसेनेतील दिग्गज नाराजींना राष्ट्रवादीत खेचत आहेत. काँग्रेस, भाजपचे नेते अंतर्गत मतभेदातच व्यस्त असूनही त्यांच्याकडून पक्षाची बांधणी होताना दिसत नाही.

जिल्ह्यातील दहा पंचायत समिती सभापती, उपसभापती आणि सदस्यांचा कार्यकाल दि. १३ मार्चला तर जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्यांचा कार्यकाल दि. २१ मार्चला संपत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या ताब्यात असतील तरच जिल्ह्यात पक्षाची मजबूत बांधणी करण शक्य असल्याचे ओळखून जयंत पाटील यांनी वाळवा, मिरज, जत, खानापूर, शिराळा, आटपाडी, पलूस, कडेगाव, कवठेमहांकाळ तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुुरू केली असून काँग्रेस, भाजपमधील अनेकांना ते राष्ट्रवादीत खेचण्याच्या तयारीत आहेत. आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, कवठेमहांकाळचे माजी मंत्री अजितराव घोरपडे, जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप या तीन नेत्यांना जिल्हा परिषद, बाजार समिती निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत आणण्यासाठी हालचाली सुरू आहेत.

घोरपडे सोमवारी पाटील यांच्या गाडीतच होते. शासकीय विश्रामगृहावर गोपनीय बैठक झाली. देशमुखांनाही राष्ट्रवादीने निमंत्रण दिले असून अमरसिंह देशमुखांकडून हिरवा कंदील आहे. पण, राजेंद्रअण्णांनी मात्र सावध पवित्रा घेतला आहे. जगताप भाजपमध्ये असले तरीही त्यांचे जयंत पाटील यांच्याशी संबंध चांगले आहेत.

सध्या जतमध्ये राष्ट्रवादीकडे सक्षम नेतृत्व नसल्यामुळे जगताप यांना खेचण्यासाठी पाटील यांचे प्रयत्न चालू आहेत. जगताप नाही म्हणत असले तरीही जिल्हा परिषद, बाजार समिती निवडणुकीत ते पाटील यांच्या बरोबरच असतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.

राष्ट्रवादीकडून राजकीय हालचाली वेगवान चालू असतांना काँग्रेस, भाजप मात्र आजही अंतर्गत मतभेदातच व्यस्त आहेत. या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते नेत्यांच्या भूमिकेमुळे गोंधळात आहेत. काँग्रेसचे नेते व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील अतंर्गत मतभेद बाजूला ठेऊन जिल्ह्यात पक्ष बांधणीसाठी प्रयत्न करणार आहेत का? असा कार्यकर्त्यांकडूनच प्रश्न उपस्थित होत आहेत.

भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, खासदार संजयकाका पाटील यांचे मनोमिलन होत नसल्यामुळे त्यांचे एकला चलोरे, अशाच भूमिकेत आहेत. माजीमंत्री शिवाजीराव नाईक आणि जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख, वाळव्यात राहुल महाडीक, सम्राट महाडीक यांनी मात्र शिराळा, वाळवा तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

शिवसेना, 'स्वाभिमानी'कडूनही तयारी

शिवसेनेकडून आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी शक्तीने लढण्यासाठी तयारी ठेवली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही मिरज, तासगाव, वाळवा, पलूस तालुक्यातील काही जागांवर निवडणूक लढविण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची निर्णायक भूमिका असणार आहे.

Web Title: NCP prepares for Sangli Zilla Parishad, Panchayat Samiti elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.