‘पन्नास खोके, महागाई ओके’, सांगलीत राष्ट्रवादीची महागाईविरोधात निदर्शने
By अविनाश कोळी | Published: September 3, 2022 03:51 PM2022-09-03T15:51:17+5:302022-09-03T15:51:56+5:30
सांगली : राष्ट्रवादीने शनिवारी सांगलीत ‘पन्नास खोके, महागाई ओके’चा नारा देत वाढत्या महागाईविरोधात निदर्शने, तसेच राज्य व केंद्र शासनाचा ...
सांगली : राष्ट्रवादीने शनिवारी सांगलीत ‘पन्नास खोके, महागाई ओके’चा नारा देत वाढत्या महागाईविरोधात निदर्शने, तसेच राज्य व केंद्र शासनाचा निषेध केला. सांगलीतील जुन्या स्टेशन चौकात आंदोलन करण्यात आले. ‘केंद्रातील भाजप सरकारचा धिक्कार असो’, ‘पन्नास खोके, महागाई एकदम ओक्के, ‘महागाई कशासाठी, आमदार खरेदीसाठी’, ‘जनता भरते जीएसटी आमदार जातात गुवाहाटी’, ‘महागाईने दुखते डोके, गद्दारांना पन्नास खोके’ अशा घोषणा देण्यात आल्या.
संजय बजाज म्हणाले की, उद्योगपतींना मोठे करणाऱ्या मोदी सरकारने या प्रचंड महागाईला पुरक पावले टाकली आहेत. अनेक शासकीय संस्था मोडीत काढत लाखो रोजगार संपुष्टात आणले आहेत. हजारो कोटींची उदयोगपतींची कर्जे माफ करणाऱ्या भाजपा सरकारने सर्वसामान्यांकडे मात्र डोळेझाकच केली आहे. केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेचा अंत न पाहता लवकरात लवकर सर्व वस्तूंच्या किमती कमी कराव्यात, अन्यथा राष्ट्रवादीमार्फत पुन्हा जोरदार आंदोलन उभारले जाईल, असा इशारा दिला.
यावेळी राहुल पवार, हरिदास पाटील, धनंजय पाटील, वंदना चंदनशिवे, महंमद मनेर, समीर कुपवाडे, महालिंग हेगडे, संदीप व्हनमाने, सुनील भोसले, अक्षय अलकुंटे, साकीब पठाण, उत्तम कांबळे, डॉ. शुभम जाधव, गॅब्रियल तिवडे, अर्जुन कांबळे, वाजीद खतीब, सुरेखा सातपुते, रुपाली कारंडे, छाया पांढरे, सुनीता जगधने, संगीता जाधव आदी उपस्थित होते.