आष्टा परिसरात राष्ट्रवादीचे शुद्धीकरण
By admin | Published: June 1, 2017 11:46 PM2017-06-01T23:46:13+5:302017-06-01T23:46:13+5:30
आष्टा परिसरात राष्ट्रवादीचे शुद्धीकरण
अशोक पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वैभव शिंदे भाजपमध्ये गेले असले तरी, त्यांचे वडील विलासराव शिंदे हे आजही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत. आष्ट्यात विलासराव शिंदे यांचाच शब्द प्रमाण मानला जात असल्याने राष्ट्रवादीच्या ताकदीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीच्या जयंत पाटील गटासोबत असलेले जिल्हा परिषदेचे अपक्ष सदस्य संभाजी कचरे यांनी, शिंदे व शिगावचे स्वरूप पाटील यांच्या जाण्याने राष्ट्रवादीचे शुध्दीकरणच झाल्याची प्रतिक्रिया ‘लोकमत’कडे दिली.
आष्टा पालिकेवर शिंदे गटाचे बहुमत असले तरी, आमदार जयंत पाटील आणि विलासराव शिंदे यांनी एकत्र येऊन सत्ता मिळविली आहे. सध्या पालिकेत २३ नगरसेवक आहेत. त्यामध्ये शिंदे गटाकडे नगराध्यक्षा स्नेहा माळी यांच्यासह सारिका मदने, झुंझारराव पाटील, विशाल शिंदे, धैर्यशील शिंदे, शैलेश सावंत, बाळासाहेब सिध्द, संगीता सूर्यवंशी, शहनवाज देवळे, शारदा खोत, प्रतिभा पेटारे, मंगलादेवी शिंदे असे ११, तर आमदार पाटील गटाकडे रुक्मिणी अवघडे, विजय मोरे, प्रकाश घस्ते, अर्जुन माने, मनीषा जाधव, पुष्पलता माळी, राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष जगन्नाथ बसुगडे, तेजश्री बोंडे, शकीर मुजावर हे ९ नगरसेवक आहेत.
विलासराव शिंदे यांना मानणारे नगरसेवक इस्लामपूर येथील वैभव शिंदे यांच्या भाजपप्रवेश कार्यक्रमास आले नव्हते. नगराध्यक्षा स्नेहा माळी आणि शिंदे गटाचे नगरसेवक आजही राष्ट्रवादीतच आहेत. विलासराव शिंदे जो आदेश देतील, त्यानुसार पालिकेच्या राजकारणात सक्रिय असल्याचे नगराध्यक्षा सौ. माळी यांनी स्पष्ट केले आहे.
याउलट बागणी जिल्हा परिषद मतदारसंघात वैभव शिंदे यांना पाडून निवडून आलेले अपक्ष, पण आ. पाटील गटासोबत असणारे संभाजी कचरे परिसरात पक्ष भक्कम करण्याच्या तयारीला लागले आहेत. वैभव शिंदे व स्वरूप पाटील यांच्या जाण्याने राष्ट्रवादीचे शुद्धीकरण झाले आहे. आष्टा परिसरात आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील सहकार, शैक्षणिक संस्थांचे जाळे आहे. त्यामुळे वैभव शिंदे यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीवर कसलाही परिणाम होणार नाही, असे कचरे यांनी स्पष्ट केले.
स्वरूप पाटील यांच्याबद्दल ते म्हणाले, की सर्वसामान्यांच्या मनातून उतरलेल्यांबाबत आपल्याला काहीच बोलायचे नाही. दरम्यान, या प्रवेशाने आगामी काळात कोणत्या घडामोडी घडणार, याकडे लक्ष लागले आहे.
निष्ठावान कोण, गद्दार कोण?
आमदार जयंत पाटील यांनी आष्टा शहरातील निष्ठावान आनंदराव शिंदे, धोंडीराम मस्के, बाबासाहेब ढोले, शंकरराव शिंदे, वसंत आवटी, बाळासाहेब वग्याणी आणि राजारामबापू उद्योग समूहाची उभारणी करण्यात आघाडीवर असणारे नानासाहेब फडतरे यांना सबुरीचा सल्ला दिल्यानेच येथे शिंदे गट वरचढ ठरला आहे. यापुढील काळात निष्ठावान आणि गद्दार कोण, याची तपासणी आ. पाटील यांनी करावी, अशी मागणी होत आहे.
मंत्रालयात पुन्हा घुसण्यासाठीच....
भाजप प्रवेशाच्या आदल्या दिवसापर्यंत, भाजपमध्ये जाणार नसल्याचे आ. पाटील यांना सांगणारे स्वरूप पाटील भाजप प्रवेशाच्या रांगेत पुढे होते. यापूर्वी आ. पाटील मंत्री असताना त्यांच्या मंत्रालयात वाऱ्या असायच्या. आता आ. पाटील यांच्याकडे मंत्रीपद नसल्याने स्वरूप पाटील यांना मंत्रालयाचे दरवाजे बंद झाले आहेत. मंत्रालयात पुन्हा घुसण्यासाठीच स्वरूप पाटील सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून आता भाजपच्या वळचणीला जाऊन बसले आहेत.