तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात ‘रोहित’ पर्व; आबांचा बालेकिल्ला भक्कम 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 05:44 PM2024-11-24T17:44:14+5:302024-11-24T17:45:01+5:30

माजी राज्यमंत्री घोरपडेंची साथ मिळूनही संजयकाकांचा धक्कादायक पराभव

NCP Sharad Chandra Pawar's candidate Rohit Patil won in Tasgaon-Kavathemahankal Assembly Constituency | तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात ‘रोहित’ पर्व; आबांचा बालेकिल्ला भक्कम 

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात ‘रोहित’ पर्व; आबांचा बालेकिल्ला भक्कम 

दत्ता पाटील

तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांनी उच्चांकी मताधिक्याने विजय मिळवला. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी साथ देऊनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी खासदार संजयकाका पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला. या विजयाने तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघ आर. आर. पाटील यांचा बालेकिल्ला भक्कम असल्याचे स्पष्ट झाले. या विजयाने तासगाव कवठेमहांकाळला रोहित पर्वाची सुरुवात झाली आहे. विजयानंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला.

तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाट्यमय घडामोडी घडत गेल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून रोहित पाटील यांची उमेदवारी निश्चित असतानाच ऐनवेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपमधून प्रवेश केलेले माजी खासदार संजयकाका पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली. त्याचवेळी त्यांना माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे अंजनी विरुद्ध चिंचणी अशी पारंपरिक लढत उभा राहिली. एकीकडे रोहित पाटील तर दुसरीकडे संजयकाका पाटील यांना अजितराव घोरपडे यांची साथ होती. त्यामुळे मतदारसंघात काट्याची टक्कर होत असल्याचे दिसून आले.

आर. आर. पाटील यांच्या पश्चात त्यांचे पूत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे या निवडणुकीकडे राज्यभराचे लक्ष लागून राहिले होते. रोहित पाटील यांच्यासाठी शरद पवार यांनी सभा घेतली होती. तर संजय पाटील यांच्यासाठी अजित पवार यांनी सभा घेतली होती. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट असा संघर्ष या निवडणुकीत पाहायला मिळाला. ही निवडणूक अत्यंत काठावर आहे, असे समजले जात असतानाच निकालानंतर मात्र नवख्या रोहित पाटील यांनी राजकारणातील मातब्बर असणाऱ्या अनुभवी संजयकाका यांना धोबीपछाड दिल्याचे दिसून आले.

शनिवारी सकाळी तासगाव येथे प्रशासकीय इमारतीत मतमोजणीला सुरुवात झाली. टपाली मतदानातच रोहित पाटील यांनी आघाडी घेतली. त्यानंतर फेरीनिहाय मतमोजणीला सुरुवात झाली. प्रत्येक फेरीत रोहित पाटील यांचे मताधिक्य वाढत गेले. एकूण २२ फेऱ्यांपैकी संजय पाटील यांचे गाव असलेल्या चिंचणी गावाचा समावेश असलेली एक फेरी आणि अजितराव घोरपडे यांचे गाव असलेल्या कोंगनोळीचा समावेश असलेल्या एक फेरीतच संजय पाटील यांना काही प्रमाणात मताधिक्य मिळाले.

प्रत्येक फेरीत रोहित पाटील आघाडीवर

कोंगनोळी वगळता उर्वरित सर्व फेऱ्यात रोहित पाटील आघाडीवर राहिले. प्रत्येक फेरीत रोहित पाटील यांचे मताधिक्य वाढत जाऊन रोहित पाटील यांचा दणदणीत मतांनी विजयी झाला. तर दुसरीकडे लोकसभेपाठोपाठच माजी खासदार संजय पाटील यांना विधानसभा निवडणुकीत देखील दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे.

जनतेचा कौल मान्य

विधानसभा निवडणुकीत विकासाचे राजकारण सोडून निवडणूक भावनिक मुद्द्यावर गेली. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. केंद्रात व राज्यात आपले महायुतीचे सरकार आहे. आपण पुन्हा विकासाच्या मार्गाने राजकारण करून लोकांच्या जनमताचा आदर करूया. कोणताही अनुचित प्रकार आपल्याकडून घडू नये याची काळजी घ्या, अशी प्रतिक्रिया माजी खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.

९५ गावात आघाडी

रोहित पाटील यांना तासगाव तालुक्यातील ४५, तर कवठेमहांकाळ तालुक्यातील ५० अशा एकूण ९५ गावांतून आघाडी मिळाली, तर संजय पाटील यांना तासगाव तालुक्यातून तीन आणि कवठेमहांकाळ तालुक्यातून ११ अशी १४ गावांतून आघाडी मिळाली.

शहरांची रोहित पाटील यांना साथ

मतदारसंघातील तासगाव आणि कवठेमहांकाळ या दोन्ही शहरांनी रोहित पाटील यांना साथ दिल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी तासगाव शहरातून आर. आर. पाटील यांना देखील मताधिक्य मिळाले नव्हते. मात्र, यावेळी रोहित पाटील यांना तासगाव शहराने लक्षवेधी मताधिक्य दिले. तासगाव शहरातून रोहित पाटील यांना २५२२ इतके मताधिक्य मिळाले, तर कवठेमहांकाळ शहरातून देखील २४१६ इतके मताधिक्य मिळाले.

एकूण मिळालेली मते

  • रोहित पाटील : एकूण १ लाख २८ हजार ४०३
  • संजय पाटील : १ लाख ७५९
  • रोहित पाटील यांचे एकूण मताधिक्य : २७ हजार ६४४

Web Title: NCP Sharad Chandra Pawar's candidate Rohit Patil won in Tasgaon-Kavathemahankal Assembly Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.