सांगलीत काँग्रेसची एकी अन् राष्ट्रवादीत बेकी; लोकसभा निवडणुकीत जयंत पाटील, सुमन पाटील यांच्या वेगळ्या वाटा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 05:48 PM2024-05-17T17:48:53+5:302024-05-17T17:49:39+5:30
''कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा''
दत्ता पाटील
तासगाव : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला नव्याची उमेदवारी मिळाली नाही. हीच गोष्ट काँग्रेसच्या पथ्यावर पडली. पडद्याआड का असेना, पण काँग्रेसचे सर्व शिलेदार एकवटले. याउलट चित्र राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाच्या नेत्यांच्यात पाहायला मिळाले. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी ''मविआ''चा अजेंडा राबवला, तर आमदार सुमन पाटील यांनी पडद्याआडून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचे काम केले. त्यामुळे काँग्रेसची एकी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले असले, या निमित्ताने राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाच्या नेत्यांच्यात मात्र विसंगती पाहायला मिळाली.
लोकसभा निवडणुकीला सांगली जिल्ह्यात काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही. त्याचे सहानुभूतीत रूपांतर करून विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली. त्यांना काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी पडद्याआडून रसत पुरवल्याच्या चर्चा आता उघडकीस येत आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील काँग्रेसचे सगळे नेते एकसंध झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र या उलट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जिल्ह्यातील चारही आमदारांनी शरद पवार यांचे नेतृत्व मान्य केले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार सुमन पाटील हे एकाच पक्षात राहिले. त्यामुळे जिल्ह्यातील शरद पवार गट एकसंघपणे काम करताना गेल्या काही काळात दिसून आला. पक्ष फुटीपूर्वी आमदार सुमन पाटील आणि आमदार जयंत पाटील यांच्यात मतभेद झाल्याचे पाहायला मिळत होते. किंबहुना जयंत पाटील यांना मानणारा तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील वेगळा गट कार्यरत होता. मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ही गटबाजी नाहीशी झाली होती.
आमदार जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी ताकद उभा केली होती. मात्र याचवेळी आमदार सुमन पाटील यांच्या गटाने पडद्याआडून एकसंधपणे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना रसद दिली. त्यामुळे आमदार जयंत पाटील आणि आमदार सुमन पाटील यांच्यातील विसंगती या निमित्ताने चव्हाट्यावर आली आहे. येणाऱ्या काळात काँग्रेस एकसंध झाली असली तरी, राष्ट्रवादीचे अंतर्गत राजकारण कोणत्या नव्या वळणावर जाईल, याचे कुतूहल निर्माण झाले आहे.
दिलदार शत्रुत्व चर्चेत
खासदार संजय पाटील यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत बोलताना ''कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा'' असा उल्लेख केला होता. हा उल्लेख करत असताना, त्यांचा रोख जयंत पाटील यांच्याकडेच असल्याची चर्चा होती. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात जयंत पाटील यांचे समर्थक असणाऱ्या पदाधिकाऱ्यांसह सगरे गटाची भूमिका चर्चेचा विषय ठरली होती. त्याच अनुषंगाने खासदार पाटील यांच्या दिलदार शत्रुत्वाची चर्चा मतदारसंघात होताना दिसून येत आहे.