जलसंपदाच्या पाण्यावर जयंतरावांचं सिंचन, जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुकांसाठी 'मार्केटिंग'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 03:14 PM2022-05-06T15:14:00+5:302022-05-06T15:14:34+5:30
जिल्ह्यातल्या कोणत्याही निवडणुकीच्या हाका सर्वांत आधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना ऐकू येतात.
श्रीनिवास नागे
जिल्ह्यातल्या कोणत्याही निवडणुकीच्या हाका सर्वांत आधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना ऐकू येतात. येत्या काही महिन्यांत जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांच्या निवडणुका होताहेत, त्याही पुढच्या लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका जयंतरावांना दिसू लागल्यात. त्यामुळेच जलसंपदासारख्या मलईदार खात्याच्या पाण्यावर त्यांनी जिल्हाभरात राष्ट्रवादीचं सिंचन सुरू केलंय. सत्तेतून बाहेर फेकलेला भाजप कानकोंडा झालाय, तर सत्तेतल्या काँग्रेस-शिवसेनेच्या हाती हे सगळं मुकाट बघत बसण्याशिवाय काही राहिलेलं नाही.
पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद हातात. जिल्ह्यावर मांड ठोकायची, तर सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात हव्यातच. त्या जोरावर पक्षातला रुबाब वाढतो, तो वेगळाच. मुरब्बी जयंतराव हे जाणतात. त्यासाठी त्यांनी हातातल्या जलसंपदा विभागाचा पुरेपूर वापर केलाय. जिल्ह्याचं राजकारण पाण्यावर फिरत असल्यानं सिंचनाच्या कामांचा धडाका लावलाय. जिल्ह्यात ३८५८ कोटींची सिंचनाची कामं पाईपलाईनमध्ये असल्याचं त्यांनी सर्वांत आधी जाहीर केलंय. जलसंपदा आणि पालकमंत्री म्हणून हे जाहीर करण्याची केवढी ती घाईगडबड! या कामांचं श्रेय केवळ स्वत:ला! ज्या-ज्या आमदारांनी आपापल्या मतदारसंघासाठी प्रस्ताव दिले, त्यांनीही बोलायचं नाही.
बोललंच तर, जयंतरावांचे प्रयत्न ठासून सांगायचे. काय बिशाद आहे, याविरोधात जायची! शिवाय जिल्हाभरातली राष्ट्रवादीची टीम आहेच, ढोल बडवायला. सगळीकडं सुरू असलेले पाणीपूजन सोहळे वेगळेच. जिल्ह्यातलं एकही गाव कृष्णा-वारणेच्या पाण्यापासून वंचित ठेवणार नाही, असं ठासून सांगायचं.
जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुका तोंडावर असताना या कामांचं मार्केटिंग झालं नसतं, तरच नवल! जिल्हा परिषदेतली सत्ता हातात नसल्याचं शल्य जयंतरावांना जाचतंय. या निवडणुकीच्या हाका ऐकू आल्यानंच त्यांनी परिवार संवाद यात्रा काढून राज्य ढवळून काढलं. अदमास घेतला. जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातली शक्तिस्थळं आणि कमकुवत धागे त्यांनी टिपलेत. आघाडी झाली तर आणि नाही झाली तर काय करायचं, याची गणितं मांडलीत. त्यानंतर काँग्रेस-शिवसेनेला जाग येण्याआधीच ‘दे धक्का’ श्रेय लाटण्याचा!
भाजप कानकोंडा, तर काँग्रेस-शिवसेनेवर कुरघोडी
- भाजपच्या दोनपैकी सांगलीच्या आमदारांच्या मतदारसंघात जलसिंचनाच्या कामांचा संबंध नाही, तर मिरजेच्या आमदारांना नक्की मतदारसंघातले प्रश्नच माहीत नाहीत. राष्ट्रवादीचे शिराळा आणि तासगाव-कवठेमहांकाळचे आमदार सोबतच असतात. पण पलूस-कडेगाव आणि जत इथं काँग्रेसला, तर खानापूर-आटपाडीत शिवसेनेला बोलण्याची फुरसतही जयंतराव देत नाहीत.
- जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी कर्नाटकातल्या तुबची-बबलेश्वर योजनेतून कमी खर्चात पूर्व भागात पाणी आणण्याचा प्रस्ताव मांडला होता, तो कधीच गुंडाळला गेलाय. उलट तिथल्या ६४ गावांसाठी सातशे कोटी खर्चाच्या विस्तारित म्हैसाळ योजनेचं काम जयंतरावांनी रेटलंय. आता खानापूर-आटपाडीत टेंभू योजनेसाठी झटणाऱ्या शिवसेनेच्या अनिल बाबरांवर कुरघोडीसाठी राष्ट्रवादी उठून बसलीय. जोरात चाललंय राष्ट्रवादीचं सिंचन.