राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भावाची ‘ईडी’कडून चौकशी, राजकीय क्षेत्रात पुन्हा खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 01:46 PM2023-08-14T13:46:07+5:302023-08-14T13:47:02+5:30
राज्याच्या व जिल्ह्याच्या राजकीय पटलावर पुन्हा तर्कवितर्कांना उधाण
सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे थोरले बंधू भगतसिंह पाटील यांना ईडीने नोटीस पाठवून त्यांची चौकशीही केली. चार दिवसांपासून सुरू असलेल्या या हालचालींबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती. रविवारी जयंत पाटील यांनीच याबाबतची स्पष्टता केली. त्यामुळे राज्याच्या व जिल्ह्याच्या राजकीय पटलावर पुन्हा तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
जयंत पाटील यांच्या भाजप व अजित पवार गटातील प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळत असतानाच ईडीच्या नोटिसीमुळे पुन्हा तर्कवितर्क सुरू झाले आहेत. जयंत पाटील यांनाही काही दिवसांपूर्वी ईडीने नोटीस बजावून चौकशी केली होती. आयएलएफएस या कंपनीशी त्यांचा संबंध असल्याचा ठपका ईडीने ठेवला होता. त्यामुळे त्यांना चौकशीस सामोरे जावे लागले. इस्लामपूर येथील त्यांच्याशी संबंधित एका संस्थेची व सांगलीतील दोन व्यापाऱ्यांचीही ईडीने चौकशी केली होती. हे प्रकरण शांत झाल्यानंतर आता जयंत पाटील यांच्या निकटवर्तीयांना नोटिसा बजावल्या जात आहेत.
भगतसिंह पाटील हे मुंबईतील हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांच्या व्यवसायाशी संबंधित काही माहिती ईडीने मागविली होती. त्यांना चौकशीलाही बोलावण्यात आले होते. जयंत पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, चार दिवसांपूर्वी माझ्या भावाला नोटीस आली होती. ईडीला ज्या गोष्टींची माहिती हवी होती, ती देण्यात आली आहे. या कारवाईचा व अन्य राजकीय घडामोडींचा काही संबंध नाही. शरद पवार व अजित पवार यांच्या भेटीशी त्याचा संबंध नाही.
जयंत पाटील पुन्हा चर्चेत
भगतसिंह पाटील यांना ईडीने नोटीस बजावल्यामुळे जयंत पाटील पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांच्या आणखी काही निकटवर्तीयांना ईडीने नोटीस बजावल्याचीही चर्चा होती. मात्र, नेमक्या किती जणांना व कोणाकोणाला नोटीस बजावली आहे, याची माहिती मिळू शकली नाही.