भररस्त्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या; सांगलीत खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 10:43 PM2023-06-17T22:43:40+5:302023-06-17T23:26:22+5:30
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, विश्रामबागचे निरीक्षक संजय मोरे यांच्यासह पाेलिस घटनास्थळी दाखल झाले
सांगली : शहरातील शंभरफूटी रस्त्यावरील माने चौक परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा घरासमोरच गोळ्या घालून निर्घृण खून करण्यात आला. नालसाब मुल्ला (वय ४१, रा. गुलाब कॉलनी, सांगली) असे मृताचे नाव आहे. घरासमोर थांबलेल्या मुल्ला याच्यावर बुलेटवरून आलेल्या दोघांनी बेछुट गोळीबार केला. यात गंभीर जखमी झालेल्या मुल्लाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडला. पूर्वीच्या एका गुन्ह्यात मुल्लावर मोकाअंतर्गत कारवाईही झाली होती.
घटनास्थळावरून माहिती अशी की, शंभर फूटी रस्त्यावरील माने चौकापासून जवळच मुल्ला राहण्यास होता. मुल्ला याचा बांधकाम साहित्य विक्रीचा बाबा सप्लायर्स या नावाने व्यवसाय आहे. समोरच्या बाजूस व्यवसाय तर पाठीमागे तो कुटूंबियांसह राहात हाेता. शनिवारी रात्री तो घरासमोर थांबला होता. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखाेरांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्याच्या दिशेने आठ गाेळ्या झाडण्यात आल्या. त्यातील चार ते पाच गोळ्या मुल्ला याच्या पोटावर व छातीवर लागल्या. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर क्षणार्धात घटनास्थळावरुन पसार झाले. गोळीबाराच्या आवाजाने मुल्ला याचे कुटूंबिय व इतर नागरिक बाहेर धावले. त्यावेळी मुल्ला रक्तबंबाळ हाेऊन गंभीर जखमी अवस्थेत अंगणात पडला होता. त्याला तात्काळ उपचारासाठी शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, विश्रामबागचे निरीक्षक संजय मोरे यांच्यासह पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. मुल्लाचा खून कोणत्या कारणासाठी याबाबत माहिती मिळू शकली नाही. तरीही यापूर्वीच्या गुन्ह्यातील वादातून ही घटना घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
मुल्ला याच्यावर पूर्वी खासगी सावकारीसह अन्य काही गुन्हे दाखल होते. तीन वर्षापुर्वी शंभर फुटी रस्त्यावरील एका टाेळीवर मोकाअंतर्गत कारवाई झाली होती. त्यामध्ये मुल्ला याचाही समावेश हाेता. यानंतर जामिनावर तो बाहेर होता. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलीतरी गेल्या काही वर्षांपासून मुल्ला बाबा ग्रुपच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ताे सक्रीय सहभागी हाेता. त्याची पार्श्वभूमी वादग्रस्तच होती.
सिव्हीलमध्ये गर्दी
उपचारासाठी नालसाब मुल्ला याला शासकीय रूग्णालयात दाखल केल्याचे समजताच त्याच्या समर्थकांनी रूग्णालयात माेठी गर्दी केली होती. गुलाब कॉलनीतील घरासमोरही नागरिक जमा झाले होते. अखेर पोलिसांनी त्यांना हटवून रस्ता खुला केला.
दाेघांनी गाेळ्या झाडल्या; आणखी काहींचा सहभाग
रात्री आठच्या सुमारास मुल्ला याच्या घराच्या परिसरात वर्दळ नव्हती. त्यात दक्षिण बाजूला अंधारही आहे. त्यामुळे नेमके किती हल्लेखोर होते याबाबत पोलिसही माहिती घेत होते. मुल्ला याच्यावर दोघांनी गोळीबार केला असला तरी अजून काहींचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
पंधरवड्यापूर्वी ‘रिलायन्स ज्वेल्स’ या सराफी दुकानावर पडलेला सहा कोटींचा दरोडा आणि त्यानंतरही जिल्ह्यात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असतानाच, शनिवारी शहरात गोळ्या घालून खून करण्यात आल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे. मुल्ला याच्या खूनातील संशयितांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथके रवाना करण्यात आली आहेत.