मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळी उचलीचे वांदे
By admin | Published: October 4, 2014 11:55 PM2014-10-04T23:55:58+5:302014-10-04T23:55:58+5:30
अधिकारी निवडणुकीत : सत्ताधारी प्रचारात
सांगली : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीनिमित्त अॅडव्हान्स (उचल) दिली जाते. पण यंदा पालिकेची आर्थिक स्थिती पाहता कर्मचाऱ्यांच्या उचलीचे वांदे निर्माण होणार आहे. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत, तिथे उचल कशी मिळणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्यात वरिष्ठ अधिकारी निवडणूक कामात मग्न आहेत. तर सत्ताधारी व विरोधक आपआपल्या उमेदवारांच्या प्रचाराला लागले आहेत.
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी अडीच हजार ते पाच हजार उचल दिली जाते. ही उचल नंतर त्यांच्या वेतनातून कपात होते. दरवर्षी सुमारे ८० लाख रुपयांची उचल होते. यंदा मात्र महापालिकेवरच आर्थिक सावटाचे ढग दाटले आहेत. गेल्या दीड वर्षापासून जमा-खर्चाचा ताळमेळ बिघडला आहे. एलबीटीच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. जकातीवेळी आठ ते नऊ कोटी रुपये दरमहा तिजोरीत जमा होत होते. पण एलबीटीत चार ते पाच कोटीपेक्षा अधिक उत्पन्न मिळालेले नाही. त्यात अन्य स्त्रोतातूनही उत्पन्न घटले आहेत. घरपट्टी, पाणीपट्टीची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. विकासकामांसाठी पैसाच हाती नाही. त्यात ठेकेदारांचे २० कोटी थकित आहेत.
कर्मचाऱ्यांना गेल्या सहा महिन्यात वेळेवर पगार मिळू शकलेला नाही. महिन्याअखेरीस कुठे चतुर्थश्रेणीच्या कर्मचाऱ्यांचे पगार होत आहेत. तर त्यावरील श्रेणीतील कर्मचाऱ्यांना पगारासाठी प्रतीक्षा करावी लागते. अशा स्थितीत यंदाही कर्मचाऱ्यांनी उचल देण्याची मागणी केली आहे. एकूणच आर्थिक स्थिती पाहता महापालिकेचे प्रशासन कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे कितपत लक्ष देईल, याबाबत साशंकता आहे. (प्रतिनिधी)