जयंत पाटलांच्या पाठोपाठ रोहित पाटलांच्या हाती ही लालपरीचे स्टेअरिंग, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 02:55 PM2022-08-16T14:55:57+5:302022-08-16T15:11:08+5:30
लालपरीचे सारथ्य केलेला व्हिडिओ व्हायरल
सांगली : काल, स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर आगारामध्ये जाऊन एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर थेट एसटीचे स्टेअरिंग हाती घेत त्यांनी शहरातून फेरफटका मारला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. तर, आज दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे पुत्र व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते रोहित पाटील यांचाही लालपरीचे सारथ्य केलेला व्हिडिओ व्हायरल झाला.
स्वातंत्र्यदिनी सांगलीच्या कवठेमहांकाळ आगाराच्या नवीन बसचे सारथ्य रोहित पाटील यांनी केले. कवठेमहांकाळ आगाराला महामंडळाने नुकत्याच दोन नवीन गाड्या दिल्या आहेत. या दोन नवीन बसेस फेऱ्या सुरु करताना कवठेमहांकाळ आगाराने युवा नेते रोहित आर. आर. पाटील यांना निमंत्रित केले होते. यावेळी रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ ते मुंबई या बसचे स्टेअरिंग हाती घेतले. अन् स्वत: ड्रायव्हिंग करत नवीन फेरीची सुरुवात केली.
बसचे सारथ्य करतानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यांना बस चालवताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. रोहित पाटील नेहमी चर्चेत असतात. स्वातंत्र्यदिनी त्यांचे बसचे सारथ्य आता चर्चेत आले आहे. आर. आर. आबांच्यानंतर रोहित पाटील यांनी तासगांव मतदार संघावर मजबूत पक्कड ठेवत जनमाणसाच्या मनात स्थान मिळवले आहे. निवडणुकीत त्यांची जादू जिल्ह्याने पाहली आहे. त्यामुळे तरुणाईमध्ये त्यांची क्रेझ आहे.
सांगली - जयंत पाटलांच्या पाठोपाठ रोहित पाटलांच्या हाती देखील लालपरीचे स्टेअरिंग pic.twitter.com/BM96LEFZ5D
— Lokmat (@lokmat) August 16, 2022