राष्ट्रवादीचा कारभार खासदारांच्या इशाऱ्यावर
By admin | Published: September 16, 2016 11:41 PM2016-09-16T23:41:28+5:302016-09-16T23:42:54+5:30
राजकीय कुस्ती : महादेव पाटील यांचा आरोप
तासगाव : तासगावच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र राष्ट्रवादीच्या एका स्वघोषित नेत्याच्या सांगण्यावरुन अर्ज मागे काढून घेण्यात आला आहे. पालिकेत भाजप आणि राष्ट्रवादीची नुरा कुस्ती सुरु असून तासगावची राष्ट्रवादी आमदार जयंत पाटील यांच्या माध्यमातून खासदार संजयकाका पाटील यांच्या इशाऱ्यावर सुरु असल्याचा आरोप काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी पत्रकार बैठकीत केला.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एकत्रित सत्ता असताना काँग्रेसचा नगराध्यक्ष होता. त्यावेळी राष्ट्रवादीतील एका स्वयंघोषित नेत्याने राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपच्या दावणीला बांधले. त्यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता घालवायचे काम केले. तेव्हापासून तासगावातील राष्ट्रवादी आमदार जयंत पाटील यांच्यामार्गे खासदार संजयकाका पाटीलच चालवत आहेत, असा आरोपही पाटील यांनी यावेळी केला.
नगराध्यक्ष निवडीवरुन खासदारांचा पक्षातील वचक संपल्याचे दिसून आले आहे. त्यांच्यातील ठेकेदार लॉबी, दोन नंबर धंदेवाले मोठे झाले आहेत. पहिल्या नगराध्यक्षाची डिजिटल काढण्याआधीच दुसऱ्या नगराध्यक्षाची निवड केली आहे. भाजपमध्ये पदांचा बाजार मांडला आहे. शहराच्या विकासाचा खेळखंडोबा मांडला आहे. याचे उत्तर येणाऱ्या निवडणुकीत जनताच मतपेटीतून देईल, असा इशाराही यावेळी महादेव पाटील यांनी दिला. (वार्ताहर)
नेत्याची सेटलमेंट
खासदार संजयकाका पाटील यांच्याबरोबर राष्ट्रवादीतील शहरातीलच एका स्वयंघोषित नेत्याचे सेटलमेंटचे राजकारण सुरु आहे. याच नेत्याने राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची पालिकेतील सत्ता घालवण्याचे काम केले. पक्षादेशाचा आव आणून नुरा कुस्तीचा खेळ खेळला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी केला.