सांगलीत युवक राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा; बेरोजगारीच्या प्रश्नावर शासनाचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2018 07:22 PM2018-02-01T19:22:06+5:302018-02-01T19:22:16+5:30
रोजगार निर्मितीचे आश्वासन तरुणांना देऊन त्यांची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
सांगली : रोजगार निर्मितीचे आश्वासन तरुणांना देऊन त्यांची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शासनाच्या विरोधात निषेधाच्या जोरदार घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील आणि जिल्हाध्यक्ष भरत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विश्रामबाग येथील पुतळ्यास अभिवादन करून मोर्चास सुरुवात झाली. निषेधाच्या जोरदार घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. याठिकाणीही निदर्शने करण्यात आली. मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.
यावेळी कार्यकर्त्यांसमोर बोलताना कोते-पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचारात देशभरातील तरुणांना खोटी आश्वासने दिली. २ कोटी रोजगार निर्मितीचे फसवे स्वप्न त्यांनी दाखविल्यामुळे युवक त्यांच्या प्रचाराला भुलले. सरकार सत्तेवर आल्यानंतर रोजगार निर्मिती करण्याऐवजी वेगवेगळ्या चुकीच्या धोरणांच्या माध्यमातून उपलब्ध असलेला रोजगारही हिरावून घेण्याचे काम सरकारने केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास योजना सुरू केली, मात्र ही योजनासुद्धा फसली. राज्यात या योजनेच्या ७ हजार २५२ प्रशिक्षण संस्थांना सरकारने पैसा दिला नाही. त्यामुळे अशा संस्था बंद पडल्या. त्याठिकाणी काम करणारे युवक बेरोजगार झाले. शासनाच्या प्रत्येक योजना फसत आहेत. त्यामुळे या धोरणांचा निषेध करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढला आहे. भरत देशमुख म्हणाले की, गेल्या चार वर्षात भाजप सरकारने केवळ भुलभुलय्या दाखविला आहे. रोजगाराचा प्रश्न महाराष्ट्रात गंभीर बनला आहे.
उच्चशिक्षित तरुणांनाही बेरोजगार म्हणून भटकावे लागत आहे. तरुणांच्यादृष्टीने तर सर्वात वाईट काळ आला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी युवक राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढेही टप्प्या-टप्प्याने आम्ही युवकांचे प्रश्न मांडतच राहू, असे ते म्हणाले. आंदोलनात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, ताजुद्दीन तांबोळी, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, शरद लाड, राहुल पवार, आदिल फरास, स्वप्नील जाधव, गणेश पाटील, खंडू पवार, कविता घाडगे, मनोज भिसे आदी सहभागी झाले होते.