इस्लामपूर येथे युवक राष्ट्रवादीचा हल्लाबोल : वीज दरवाढ मागे घेण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:10 AM2018-10-16T00:10:37+5:302018-10-16T00:12:49+5:30
सध्या भाजप सरकारच्या काळात वाढीव वीजबिले व अतिरिक्त भारनियमनाच्या झटक्यांनी राज्यातील सामान्य नागरिक व शेतकरी त्रस्त झाला आहे. शासनाने तातडीने वीजबिले कमी करून सर्वांना योग्य दाबाने, नियमित वीज द्यावी, अन्यथा ‘वाळवा स्टाईल’
इस्लामपूर : सध्या भाजप सरकारच्या काळात वाढीव वीजबिले व अतिरिक्त भारनियमनाच्या झटक्यांनी राज्यातील सामान्य नागरिक व शेतकरी त्रस्त झाला आहे. शासनाने तातडीने वीजबिले कमी करून सर्वांना योग्य दाबाने, नियमित वीज द्यावी, अन्यथा ‘वाळवा स्टाईल’ आंदोलनाचा झटका देऊ, असा इशारा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे वाळवा तालुकाध्यक्ष संग्राम पाटील यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, युवक तालुकाध्यक्ष संग्राम पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाळवा तालुक्यातील युवकांनी सोमवारी इस्लामपूर येथील वीज महावितरणच्या विभागीय कार्यालयावर जोरदार हल्लाबोल करून, वाढीव वीज बिलांची होळी केली. यावेळी ठिय्या आंदोलन करून उपकार्यकारी अभियंता राजेंद्र सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘या सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय, ‘राज्य सरकारचा धिक्कार असो, वीज दरवाढ व अतिरिक्त भारनियमन कमी व्हायलाच हवे’ आदी घोषणांनी इस्लामपूर बसस्थानक परिसर दणाणून सोडला होता.
विजय पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना कमी दराने, नियमित वीज देण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्य सरकारने कित्येक वेळा शेतकºयांच्या शेतीपंपाची वीज दरवाढ व अलीकडे अतिरिक्त भारनियमन केले जात आहे. सरकारच्या भरमसाट दरवाढीने सामान्य माणूस व शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. याला भाजप सरकारची धोरणेच जबाबदार आहेत.
या आंदोलनात विनायक यादव, मनोज पाटील, अजित बेनाडे, असिफ पटेल, हणमंत कदम, स्वप्नील पाटील, सतीश पाटील, सुहास खोत, भागवत पाटील, नंदकुमार कोळेकर, वीरधवल होरे, सुशील पाटील, प्रशांत थोरात, अक्षय मोरे, सुजित साळुंखे, सचिन साळुंखे, रवी सूर्यवंशी, डॉ. प्रकाश पाटील, बाजीराव बेनाडे, राजेंद्र पाटील सहभागी झाले होते.
खरीप : पिके वाळली
पाणी असूनही, वीज नसल्यामुळे खरीप हंगामातील पिके वाळू लागली आहेत. तरीही शेतकºयांकडे भाजप सरकारचे लक्ष दिसत नाही. वीज अखंडित मिळत नसताना, पुन्हा ग्राहकांवर वीज बिलाचा बोजा टाकण्यात आल्याचा आरोपही आंदोलकांनी केला.