तरुण, स्वच्छ चेहऱ्यास देणार राष्ट्रवादीची उमेदवारी
By admin | Published: October 25, 2016 11:46 PM2016-10-25T23:46:09+5:302016-10-26T00:11:08+5:30
सुमन पाटील : तासगावात घेतल्या शंभरहून अधिक इच्छुकांच्या मुलाखती; पक्षनिरीक्षक उपस्थित
तासगाव : नगरपालिका निवडणुकीसाठी यंदा २१ वॉर्डांतून व १0 प्रभागांमधून लढत होत आहे. यासाठी सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. सोमवारी आमदार सुमनताई पाटील यांनी शंभरहून अधिक जणांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी प्रत्येक उमेदवाराचा अभ्यास, त्याची विकासकामे, लोकसंपर्क याची माहिती घेतली. तरुण व स्वच्छ चेहऱ्यासच राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पक्षनिरीक्षक दिलीप पाटील, स्मिता पाटील, प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी, नगरसेवक अजय पाटील, अमोल शिंदे, अभिजित माळी उपस्थित होते.
तासगाव नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. अनेकांनी थेट नगराध्यक्ष ते नगरसेवक पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधत, आपापल्या पक्षांकडे उमेदवारी मागितली आहे. भाजपकडून अनेक जणांनी उमेदवारी मिळण्यासाठी देव पाण्यात घातले आहेत.
शनिवारी खासदार पाटील यांनी चिंचणी येथे निवासस्थानी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, सोमवारी राष्ट्रवादीकडून आमदार सुमनताई पाटील यांनी गजानन कोल्ड स्टोअरेज येथे राष्ट्रवादी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी शंभरहून अधिक इच्छुक उमेदवारांनी समर्थकांसह येऊन मुलाखती दिल्या. प्रभाग क्रमांक दोनमध्ये एका इच्छुकाने ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून २00 ते ३00 समर्थकांसह येऊन उमेदवारी मागितली.
यावेळी आमदार पाटील यांनी, उमेदवारांची आर्थिक पत, वॉर्डातली माहिती, लोकसंख्या, प्रभागातील नेटवर्क, विकासकामे, विरोधक यांची विस्तृत माहिती घेतली. मुलाखतीसाठी अनेक इच्छुक दिवसभर थांबून होते. १०० हून अधिक जणांंनी मुलाखती दिल्या. तरुणांना तसेच स्वच्छ चेहऱ्यासच उमेदवारी दिली जाईल, असे आमदार सुमनताई पाटील यांनी यावेळी सांगितले.
सुरेश पाटील, हणमंत देसाई, अमोल शिंदे, राजू थोरात, कमलेश तांबवेकर, यासीन मुल्ला, अभिजित माळी, राजू सावंत, अनिल जाधव, पवार गुरूजी, बापू धनवडे यावेळी उपस्थित होते. मुलाखतीसाठी स्वत: पक्षनिरीक्षक दिलीपतात्या पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)
‘थेट’साठी १३ जण इच्छुक
सोमवारी आमदार सुमनताई पाटील यांनी घेतलेल्या राष्ट्रवादी इच्छुकांच्या मुलाखतीस मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी थेट नगराध्यक्ष पदासाठी तब्बल तेरा जणांनी राष्ट्रवादी पक्षाकडून आपण इच्छुक असल्याचे सांगत उमेदवारीची मागणी केली. चर्चेअंती यासाठी उमेदवार निश्चित करण्यात येणार आहेत.