अवैध धंद्यांवरून राष्ट्रवादीचे भाजपला आव्हान
By admin | Published: January 24, 2016 12:25 AM2016-01-24T00:25:55+5:302016-01-24T00:37:34+5:30
तासगावातून रणशिंंग : गृहराज्य मंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष, राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशारा
दत्ता पाटील ल्ल तासगाव
राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अवैध धंद्यांवरुन भाजप सरकारवर निशाणा साधला. तासगावसह राज्यभरात गेल्या वर्षभरात अवैध धंद्यांना उधाण आले आहे. भाजप सरकारने १६ फेब्रुवारीपर्यंत अशा धंद्यांना लगाम घातला नाही, तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा खासदार सुळे यांनी दिला. या आंदोलनाचे रणशिंंग तासगावातून फुंकले गेले. यापूर्वी स्मिता पाटील यांनीही मटक्यासह अवैध धंद्यांविरोधात आंदोलन केले होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या आव्हानावर भाजप सरकार कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले असून, गृहराज्यमंत्री अवैध धंद्यांविरोधातील भूमिका जाहीर करणार का? याची उत्सुकता आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर काही महिन्यांपासून विरोधकाची भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रवादीकडून अवैध धंद्यांविरोधात सातत्याने आवाज उठवला जात आहे. विशेषत: तालुक्यात सुरु असलेल्या मटका व्यवसाय चर्चेत आला आहे.
माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आघाडी सरकारमध्ये गृहमंत्रिपदाची धुरा सांभाळत असताना तालुक्यातून मटका हद्दपार झाल्याचे चित्र होते. मात्र काही महिन्यांपासून तालुक्यात पुन्हा मटका व्यवसाय तेजीत आला. तासगाव शहरासह ग्रामीण भागातही या व्यवसायाचे मोठे पेव फुटले आहे.
काही गावांचा अपवाद वगळल्यास तालुक्यातील सर्वच गावांत खुलेआम मटका व्यवसाय आहे. एकाएका गावात मटका गोळा करणाऱ्या दोन-तीन एजंटांचे जाळे आहे. तर तासगाव शहरात मटका बुकींचे मोठे जाळे आहे. शहरातील काही ठिकाणांवर राजरोज मटक्याचे कलेक्शन होताना दिसून येत आहे. एवढेच नव्हे, तर झोपडपट्टीधारकांसाठी बांधलेल्या घरकुलाच्या इमारतीतही मटका गोळा केला जात असल्याची चर्चा आहे. मटक्याच्या आमिषाला कामाला जाणाऱ्या कामगारापासून शाळा-महाविद्यालयातील तरुणाईही बळी पडल्याचे चित्र आहे.
या मटका व्यवसायाला कोणाचा वरदहस्त आहे? पोलीस यंत्रणेकडून काय कारवाई केली जात आहे? असेही प्रश्न उपस्थित झाले.
या प्रश्नांची उत्तरे पोलीस यंत्रणेकडे आहेतही, किंंबहुना राजकारणात प्रतिनिधित्व करणाऱ्यांनाही ते माहिती आहे. इतकेच नव्हे, तर तासगाव शहरातील एखाद्या चौकात मटक्याचा विषय निघाला, तर कोणाचा मटका कोठे सुरू आहे, कोणाच्या मटक्याला कोणाचा वरदहस्त आहे, याचीही उघडपणे चर्चा सुरू असते.
हाच धागा पकडून काही दिवसांपूर्वी मटक्याविरोधात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनानंतर भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनीही आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर टीका केली. यानिमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांतील शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे तासगाव दौऱ्यावर आल्यानंतर आमदार सुमनताई पाटील यांनी अवैध धंद्यांमुळे महिलांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याची खंत व्यक्त केली होती. त्यामुळे खासदार सुळे यांनी तासगावात झालेल्या कार्यक्रमात भाजप सरकारवर जोरदार टीका केली. अशा धंद्यांना भाजप सरकारच कारणीभूत असल्याचा आरोप करुन १६ फेब्रुवारीपर्यंत धंदे बंद झाले नाहीत, तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही दिला.
खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप राज्य सरकारला आव्हान दिल्यामुळे आणि त्याचे रणशिंंग तासगावातून फुंकल्यामुळे अवैध धंद्यांविरोधात भाजप सरकार कोणती भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे. रविवारी राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे तासगाव तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्याही भूमिकेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
पोलीस करतात काय?
पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंंगळे यांच्या विशेष मोहिमेमुळे अवैध धंद्यांना लगाम बसला आहे. त्यांच्या कारवाईच्या धडाक्यामुळे जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत मटक्याविरोधात तासगाव तालुक्यात सर्वाधिक कारवाई झालेली आहे. हे खरे असले तरीही तालुक्यात अद्यापही मोठ्या प्रमाणात मटका सुरु आहे, हे वास्तव आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, त्यांच्यावर असलेला कामाचा ताण याही गोष्टी कारणीभूत आहेतच. तरीदेखील मटक्याविरोधातील कारवाईच्याबाबतीत प्रत्यक्षात फिल्डवर काम करणाऱ्या पोलिसांची भूमिका शंकास्पदच राहिली आहे. प्रत्यक्ष जनमाणसापर्यंत पोहोचून काम करणाऱ्या पोलिसी यंत्रणेच्या डोळ्यांवर पट्टी कशासाठी? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.