राष्ट्रवादीचे चंद्रकांत हाक्के भाजपच्या वाटेवर
By admin | Published: October 27, 2015 11:17 PM2015-10-27T23:17:44+5:302015-10-28T00:01:41+5:30
राष्ट्रवादीला फटका
कवठेमहांकाळ : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा बनात मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमामध्ये जिल्हा बॅँकेचे संचालक व राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत हाक्के यांनी व्यासपीठावर उपस्थिती लावली. हाक्के भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत त्यांच्या या उपस्थितीने दिले. याची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू असून, राष्ट्रवादीच्या गोटात मात्र चिंतेचे वातावरण आहे.राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अनेक कार्यकर्ते सैरभैर झाले असून राष्ट्रवादी पक्षाला अवघ्या काही महिन्यातच गळती लागली. या नाराजीचा फायदा घेण्यासाठी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम तसेच भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी मतदारसंघात जोरदार ‘फिल्डिंग’ लावली. खासदार संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादीचे मातब्बर कार्यकर्ते फोडण्यात व आपल्याकडे खेचण्यात बाजी मारली.महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचे खंदे कार्यकर्ते व माजी उपसभापती दादासाहेब कोळेकर, माजी उपसभापती अनिल शिंदे, विद्यमान सभापती वैशाली पाटील, पंचायत समिती सदस्य शिवाजी चंदनशिवे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला. त्यानंतरही अनेक कार्यकर्ते खा. पाटील यांच्या संपर्कात असल्याचे समजते. आता राष्ट्रवादी पक्षाचे कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रमुख नेते व जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे संचालक चंद्रकांत हाक्के हेही भाजपच्या संपर्कात असल्याचे संकेत मिळत आहेत. मंगळवारी आरेवाडी येथील मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यक्रमात हाक्के यांनी टेंभू योजनेसह विविध मागण्यांचे निवेदन त्यांना दिले व व्यासपीठावर जाहीर उपस्थिती लावली. त्यामुळे हाक्के भाजपच्या वाटेवर असल्याचा संशय दाट झाला असून, ते भाजपप्रवेश नेमका कधी करणार आणि राष्ट्रवादी कशासाठी सोडणार, याची चर्चा कवठेमहांकाळ तालुक्यात सुरू झाली आहे. (वार्ताहर)
राष्ट्रवादीला फटका
हाक्के भाजपमध्ये गेल्यास मोठा फटका राष्ट्रवादी कॉँग्रेसला बसणार आहे. कारण हाक्के यांना मानणारा तालुक्यात मोठा गट आहे. ढालगाव परिसरावर गेली १०-१५ वर्षे त्यांचे प्राबल्य आहे. त्यांच्या पत्नी राधाबाई हाक्के जिल्हा परिषदेच्या माजी सभापती असून विद्यमान सदस्या आहेत.