राष्ट्रवादीत फुटला गटबाजीचा नारळ
By admin | Published: May 7, 2017 11:56 PM2017-05-07T23:56:25+5:302017-05-07T23:56:25+5:30
सांगलीत बैठक : संजय बजाजविरोधी गटाकडून कोअर कमिटी स्थापन; नगरसेवकांचाही समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका निवडणुकांसाठी तयारी सुरू असतानाच, राष्ट्रवादीतील छुपा संघर्ष आता उघड होताना दिसत आहे. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्याविरोधात महापालिका क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते एकवटले असून, रविवारी येथील एका हॉटेलमध्ये त्यांनी स्वतंत्र बैठक घेतली. कोअर कमिटी स्थापन करून बजाज यांच्या हातून सर्व सूत्रे काढून घेण्याचा निर्धार त्यांनी केल्याचे समजते.
राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस मुख्यालयाजवळील एका हॉटेलमध्ये रविवारी दुपारी बैठक पार पडली. या बैठकीत महापालिका क्षेत्रासाठी कोअर कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कमिटीत महापालिकेचे विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, माजी नगरसेवक पद्माकर जगदाळे, माजी महापौर सुरेश पाटील, मैनुद्दीन बागवान, दिग्विजय सूर्यवंशी, हरिदास पाटील, सचिन जगदाळे, राहुल पवार, सचिन सावंत आदींचा समावेश करण्यात आला आहे. विरोधी पक्षनेता निवडीवेळी बजाज यांच्याविरोधात शड्डू ठोकणारे बहुतांश नगरसेवक व नेते या बैठकीस उपस्थित होते. त्यामुळे कोअर कमिटी स्थापन करून या गटाने छुप्या संघर्षाला तोंड फोडले आहे.
सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील राष्ट्रवादीअंतर्गत गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू आहे. विशेषत: संजय बजाज यांच्याविरोधात अनेकजण एकवटले आहेत. बजाज हे जयंत पाटील यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते मानले जातात. महापालिका क्षेत्रातील राजकारण करताना बजाज यांचेच बहुतांश निर्णय अंतिम होत असतात. पदाधिकाऱ्यांच्या निवडी करतानाही बजाज यांचे मत घेतले जाते. याचाच पक्षांतर्गत काही लोकांना राग आहे. त्यातूनच गटबाजी उफाळली आहे. कमलाकर पाटील यांची विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बजाजविरोधी गट अधिक प्रबळ झाला.
कमलाकर पाटील यांनी बजाजविरोधी गटाची मोट बांधली आहे. त्यांनीच कोअर कमिटीचा निर्णय घेऊन बजाज यांना शह देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.
महापालिकेची निवडणूक कॉँग्रेस व राष्ट्रवादी एकत्रितपणे लढणार असल्याचे दोन्ही जिल्हाध्यक्षांनी जाहीर केले आहे. तरीही राष्ट्रवादीतील एका गटाला हा निर्णय मान्य नाही. जोपर्यंत जयंत पाटील याबाबतचा आदेश देत नाहीत, तोपर्यंत आघाडीचा विचारच करणार नसल्याचे त्यांचे मत आहे. रविवारी कमलाकर पाटील यांनी घेतलेल्या बैठकीतही आघाडीबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीने कॉँग्रेसबरोबर न जाण्याचेही काहींनी सुचविले. प्रत्यक्षात याबाबत कोणताही निर्णय बैठकीत घेण्यात आलेला नाही.
जयंतरावांची डोकेदुखी
पक्षांतर्गत गटबाजी थांबविताना आता पक्षाचे नेते आ. जयंत पाटील यांची डोकेदुखी वाढणार आहे. एका बाजूला त्यांचे विश्वासू साथीदार संजय बजाज, तर दुसरीकडे पक्षाचे अनेक महत्त्वाचे कार्यकर्ते असल्याने त्यांची कसरत होणार आहे. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सोमवार, दि. ८ मे रोजी जयंत पाटील सांगलीत येत आहेत. गटबाजीच्या पार्श्वभूमीवर ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याची चिन्हे आहेत.
पदांचे वाटप
कोअर कमिटीत कार्याध्यक्ष म्हणून पद्माकर जगदाळे यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. मार्गदर्शक म्हणून माजी महापौर सुरेश पाटील काम पाहणार आहेत. उपाध्यक्षपदी मैनुद्दीन बागवान, दिग्विजय सूर्यवंशी यांची निवड झाली आहे. कोअर कमिटीमार्फत आता प्रभागनिहाय जयंत पाटील यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम आखला जाणार आहे. वास्तविक महापालिका क्षेत्राची जबाबदारी बजाज यांच्याकडे असतानाही ही कोअर कमिटी आता त्यांचे काम स्वत: हाती घेण्याची शक्यता आहे.