सांगलीत वृक्षतोडप्रकरणी राष्ट्रवादीची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 03:23 PM2019-01-30T15:23:42+5:302019-01-30T15:24:34+5:30
आमराई उद्यानातील वृक्षतोडप्रकरणी दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
सांगली : आमराई उद्यानातील वृक्षतोडप्रकरणी दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
आमराई उद्यानालगतच्या आॅफिसर्स क्लबच्या टेनीस कोर्टावर पालापाचोळा पडतो म्हणून रविवारी आठ झाडांची कत्तल करण्यात आली. सुट्टीचा दिवस पाहून ही झाडे तोडण्यात आली. त्यामुळे निसर्गपे्रमीसह राजकीय पक्षांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने झाडे तोडल्याजागी निदर्शने करण्यात आली. तसेच नवीन दोन वृक्षांचे रोपणही केले. यावेळी नगरसेवक संगीता हारगे, आयुब पठाण, योगेंद्र थोरात, हरिदास पाटील, छाया जाधव, उत्तम कांबळे, सागर घोडके, शुभम जाधव यांच्यासह राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते.
आमराईतील ५० वर्षांची जुनी झाडे तोडण्यात आली. ही झाडे तोडताना कसलीही परवानगी घेतलेली नाही. हा विषय महापालिकेच्या वृक्ष समितीसमोरही ठेवलेला नाही. धोकादायक वृक्ष, फांद्यांमुळे सामान्य माणसाच्या घराला धोका झाला तरी, त्याला महापालिकेकडे चार-चार महिने हेलपाटे मारावे लागतात.
या प्रकरणात मात्र २५ जानेवारीला अर्ज आला आणि २७ जानेवारीला झाडे तोडण्यात आली. हा प्रकार गंभीर आहे. उपायुक्त मौसमी बर्डे यांनी ही झाडे उद्यान विभागाने तोडावीत, असा शेरा अर्जावर मारला आहे. तरीही खासगी लोकांनी जेसीबी व कटरच्या साहाय्याने झाडे तोडली.
त्याबाबत कुणाचे आदेश होते, कोणत्या कायद्याने झाडे तोडली, याचा सविस्तर अहवाल ंमहापौर संगीता खोत यांनी उपायुक्तांकडून मागविला आहे. तातडीने याप्रकरणी कारवाई व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी केली आहे.