महापालिका सभेत लागणार राष्ट्रवादीचा कस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:18 AM2021-07-19T04:18:03+5:302021-07-19T04:18:03+5:30
सांगली : महापालिकेतील सत्तांतरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनमानी कारभाराविरोधात सहकारी काँग्रेस पक्षात नाराजीचा सूर आहे. त्यातच विरोधी भाजपनेही आता आक्रमक ...
सांगली : महापालिकेतील सत्तांतरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनमानी कारभाराविरोधात सहकारी काँग्रेस पक्षात नाराजीचा सूर आहे. त्यातच विरोधी भाजपनेही आता आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सोमवारच्या महासभेत राष्ट्रवादी काँग्रेसचा कस लागणार आहे. नाल्याचे बांधकाम, आरक्षणासह विविध विषयांवरून ही सभा वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.
महापालिकेची सभा सोमवारी होत आहे. या सभेत कुपवाड ड्रेनेज योजनेचा २२७ कोटींचा, तर काळी खण सुशोभिकरणाचा ९ कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहे. महासभेच्या मान्यतेनंतर हे दोन्ही प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार आहेत. या सभेत कुपवाड येथील प्राथमिक शाळा व क्रीडांगणांचे आरक्षण उठवण्याचा पुन्हा विषय आणण्यात आला आहे. १४ व्या वित्त आयोगातून नाले बांधकामासाठी महापालिकेस प्राप्त झालेल्या निधीतून चैत्रबन नाला ते आरवाडे पार्क नाल्याचे बांधकाम करायचे, की यापूर्वी महासभेने ठरवलेल्या पाच व स्थायी समितीने मान्यता दिलेल्या आठ नाल्यांचे काम करायचे, याबाबतचा प्रस्तावही सभेत आणण्यात आला आहे.
त्यातच गेल्या चार महिन्यांपासून महासभेत विषय घुसडून राष्ट्रवादीने वाद ओढवून घेतला आहे. सहकारी काँग्रेस पक्षालाही राष्ट्रवादीने विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे काँग्रेस नगरसेवकांत राष्ट्रवादीच्या कारभाराबद्दल नाराजी आहे. काँग्रेसच्या सदस्यांनी याविरोधात आवाज उठविला आहे. सत्ता गमाविल्यामुळे भाजपचे नगरसेवक दुखावले आहेत. भाजपच्या बैठकीत या सदस्यांना आक्रमक होण्याचा सल्ला नेत्यांनी दिला. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनीही राष्ट्रवादीविरोधात कंबर कसली आहे. त्यामुळे सोमवारची महासभा गाजण्याची चिन्हे आहेत.