अभिवादन कार्यक्रमातही राष्ट्रवादीची गटबाजी
By admin | Published: May 31, 2017 11:18 PM2017-05-31T23:18:02+5:302017-05-31T23:18:02+5:30
अभिवादन कार्यक्रमातही राष्ट्रवादीची गटबाजी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात बुधवारी राष्ट्रवादीच्या येथील कार्यालयात पुन्हा गटबाजीचे दर्शन घडले. संजय बजाज यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास दुसऱ्या गटाने गैरहजेरी लावली. महापालिकेतील विरोधी पक्षनेते, स्थायी समिती सभापती या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावताना नगरसेवक गायब होते.
राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी अहिल्यादेवींच्या जयंतीचा कार्यक्रम जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित केला होता. त्याबाबतची निमंत्रणे त्यांनी त्यांच्या व्हॉटस्-अॅप ग्रुपवर टाकली होती. अनेकांना दूरध्वनीवरूनही निमंत्रित केले होते. तरीही बुधवारी प्रत्यक्ष कार्यक्रमात गटबाजीने पुन्हा डोके वर काढले. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे सांगली विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष कमलाकर पाटील आणि संजय बजाज यांच्यात दोन गट पडले आहेत. बहुतांश नगरसेवकांना आपल्याकडे खेचून कमलाकर पाटील यांनी स्वतंत्र कोअर कमिटी स्थापन केली आहे. विरोधी पक्षनेत्यांचा अपवाद वगळता या कोअर कमिटीचा एकही सदस्य बुधवारी अहिल्यादेवींच्या जयंती कार्यक्रमास उपस्थित नव्हता. त्यामुळे कोणत्या गोष्टीत गटबाजी दाखवावी, याचेही भान आता राष्ट्रवादी पदाधिकारी आणि नगरसेवकांना राहिलेले नाही, असा सूर कार्यकर्त्यांमधून उमटत होता.
महापालिकेतील स्थायी समिती सभापती संगीता हारगे, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, नगरसेवक युवराज गायकवाड, संजय बजाज, राष्ट्रवादीचे सांगली शहराध्यक्ष सागर घोडके, लीलाताई जाधव, योगेंद्र थोरात, राधिका हारगे, आयेशा शेख, सागरजित पाटील, शेरू सौदागर, अजिज मुल्ला एवढे मोजकेच लोक कार्यक्रमास उपस्थित होते. महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिलेबी वाटपाचा कार्यक्रमही करण्यात आला. महापालिकेतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि एक नगरसेवक वगळता अन्य नगरसेवकांनी दांडी मारली. कमलाकर पाटील यांचा संपूर्ण गट अनुपस्थित होता. पदांच्या राजीनाम्यावरून सुरू झालेला वाद आता टोकाला गेला आहे.
गेल्या महिन्याभरात एकमेकांच्या पक्षीय बैठकांवर बहिष्कार टाकण्याचे काम दोन्ही गटांनी केले होते. पक्षीय कार्यक्रमातील गटबाजी नवी नसली तरी आजवर कधीही राष्ट्रवादी कार्यालयात महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी कार्यक्रमास गटबाजीचे दर्शन झाले नव्हते. बुधवारी या गोष्टीही दिसून आला. काही कार्यकर्त्यांनी याबाबत नाराजीही व्यक्त केली. त्यामुळे राष्ट्रवादीअंतर्गत गटबाजी आता नेत्यांची डोकेदुखी बनणार आहे. एकमेकांच्या कार्यक्रमांना गर्दी होऊ नये म्हणूनही कुरघोड्या केल्या जात आहेत. महापालिका क्षेत्रापुरते अस्तित्व राहिलेली राष्ट्रवादी आता गटबाजीने पोखरत निघाली आहे.
नेत्यांची शिष्टाई : निष्फळ
काही दिवसांपूर्वी सांगलीत दोन्ही गटांशी पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी चर्चा केली होती. या चर्चेवेळी त्यांनी दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेतले होते. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षात असे वाद योग्य नसल्याचे स्पष्ट करताना, दोन्ही गटांना सबुरीचा सल्लाही जयंतरावांनी दिला असल्याचे समजते. त्यानंतर उघडपणे एकमेकांविरोधात टीका करण्याचे दोन्ही गटांनी थांबविले, मात्र धुसफूस कायम आहे. बुधवारी या गोष्टी स्पष्टपणे दिसून आल्या. पक्षाचा वर्धापन दिन साजरा करतानाही हाच प्रकार समोर आला. मे महिन्यातच यासंदर्भातील बैठक संजय बजाज यांनी बोलावली होती. त्या बैठकीलाही विरोधी गट अनुपस्थित होता. पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला गटबाजीचा वर्धापन दिन साजरा होण्याची वेळ आली.
छुप्या कुरघोड्या
नेत्यांच्या आदेशानंतर शांत दिसणारे दोन्ही गट प्रत्यक्षात छुप्या लढाईत मग्न आहेत. राष्ट्रवादीचे सामान्य कार्यकर्ते यात भरडले जात आहेत. पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी बुधवारी याबाबत स्पष्टपणे नाराजी व्यक्त करताना पक्षाची वाटचाल चुकीच्या दिशेने होत असल्याचे मत मांडले.