विटा बाजार समितीत राष्ट्रवादीची ‘महायुती’

By Admin | Published: July 1, 2015 11:23 PM2015-07-01T23:23:54+5:302015-07-02T00:27:51+5:30

निवडणूक : युतीतील नाराज, शेतकरी संघटना, रिपाइं, समतावादी महासंघाचा समावेश

NCP's 'Mahayuti' in Vita Market Committee | विटा बाजार समितीत राष्ट्रवादीची ‘महायुती’

विटा बाजार समितीत राष्ट्रवादीची ‘महायुती’

googlenewsNext

विटा : खानापूर व कडेगाव तालुका कार्यक्षेत्र असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांच्या नेतृत्वाखाली समविचारी पक्षांची महायुती झाली असून, त्याबाबतची अधिकृत घोषणा बुधवारी अ‍ॅड. मुळीक यांनी केली. यावेळी खानापूर सूतगिरणीचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, पाणी संघर्ष चळवळीचे नेते मोहनराव यादव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय विभुते, रिपाइंचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, शेतकरी संघटनेचे रामभाऊ कणसे, नवनाथ पोळ, शेतकरी सेनेचे भक्तराज ठिगळे, समतावादी महासंघाचे काकासाहेब ऐवळे, भाजपचे अमोल खामकर आदी उपस्थित होते.
विटा बाजार समितीत शेतकऱ्यांच्या सोयी-सुविधांसाठी प्रस्थापितांनी त्यांच्या कार्यकाळात कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने, बाजार समितीच्या विकासासाठी समविचारी पक्षांची महायुती निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे यावेळी अ‍ॅड. मुळीक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
निवडणुकीसाठी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम व भाजपचे नेते माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची युती झाली आहे. त्यामुळे अ‍ॅड. मुळीक यांनी जुनी शिवसेना, जुनी भाजप, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना, शेतकरी सेना, रिपाइं, समतावादी महासंघ यांच्यासह अन्य समविचारी पक्षांची मोळी बांधल्याचे सांगितले.
ते म्हणाले की, २००१ ते २००६ ची बाजार समितीची निवडणूक नेतेमंडळींनी बिनविरोध केली होती. परंतु, त्यानंतर पदाधिकारी निवडी व कामकाजासाठी मार्गदर्शन करण्यास ही नेतेमंडळी कधीच एकत्रित आली नाहीत. त्यामुळे बाजार समिती विकासापासून वंचित राहिली.
संजय विभुते म्हणाले की, शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष अन्य राजकीय पक्षांना सोबत न घेता एकत्रित आले, तर आम्हीही आ. अनिल बाबर यांच्या पाठीशी राहू, पण कॉँग्रेसमधील मोहनराव कदम गटाला सोबत घेऊन युती केल्यास जुन्या शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी महायुतीत सहभागी होतील.
पत्रकार परिषद सुरू असतानाच भाजपचे जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड यांनी दूरध्वनीवरून, भाजपचा जुना गट अ‍ॅड. मुळीक यांच्या महायुतीत सहभागी असल्याचे सांगितले. त्यामुळे मुळीक यांच्या नेतृत्वाखालील महायुतीवर शिक्कामोर्तब झाले. (वार्ताहर)


...तरच अनिल बाबर यांच्या पाठीशी
निवडणुकीसाठी आमदार अनिल बाबर, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम व भाजपचे नेते पृथ्वीराज देशमुख यांची युती झाली आहे. यामुळे सेना व भाजपमधील जुने निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले आहेत. इतर पक्षांना बरोबर न घेता केवळ सेना-भाजप एकत्र आले तर आ. बाबर यांच्या पाठीशी उभे राहू, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.

Web Title: NCP's 'Mahayuti' in Vita Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.